Home > News Update > मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अडचणी 15 दिवसात सोडावा - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अडचणी 15 दिवसात सोडावा - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अडचणी 15 दिवसात सोडावा -  मुख्यमंत्र्यांचे निर्देश
X

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी हा राज्य शासनाचा ‘फ्लॅगशीप’ कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून विकासकांना काम करताना येत असणाऱ्या अडचणींचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा घेऊन येणाऱ्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जमीन अतिक्रमीत झालेल्या ठिकाणी प्रकल्प विकासक तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित बैठक घ्यावी. अतिक्रमित जमिनीसंदर्भातील विकासकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना जबाबदारी देण्यात यावी.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाकरिता प्रकल्प विकासकांना लागणाऱ्या आवश्यक सर्व परवानग्या ऑनलाईन देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा प्रकल्प राबवितांना काही अडचणी येत असतील आणि त्या जिल्हापातळी, गावपातळीवर सोडविणे शक्य नसेल तर त्या मंत्रालय स्तरावर सोडविल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ची आढावा बैठक झाली. या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, प्रधान सचिव एकनाथ डवले, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य विद्युत निरिक्षक संदीप पाटील, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे दूरदृश्य प्रणालीद्वारे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे तसेच पुणे, जालना, लातूर, अहिल्यानगर, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच या प्रकल्पाचे विकासक उपस्थित होते.

Updated : 2 Jan 2025 5:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top