Home > News Update > गोरगरीबांनाही अद्ययावत सुविधांचा लाभ द्यावा- डॉ. जितेंद्र आव्हाड

गोरगरीबांनाही अद्ययावत सुविधांचा लाभ द्यावा- डॉ. जितेंद्र आव्हाड

मुंब्रा- शिळफाटा येथे महिला डॉक्टरांनी पुढाकार घेत फक्त महिलांसाठी क्वीन्स केअर नावाचे अद्ययावत रुग्णालय सुरु करण्यात आले.

गोरगरीबांनाही अद्ययावत सुविधांचा लाभ द्यावा- डॉ. जितेंद्र आव्हाड
X

मुंबई : मुंब्रा- शिळफाटा येथे महिला डॉक्टरांनी पुढाकार घेत फक्त महिलांसाठी क्वीन्स केअर नावाचे अद्ययावत रुग्णालय सुरु केले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. आव्हाड यांनी, दक्षिण आशियामध्ये प्रथमच मुंब्रा येथे पांडा वॉर्मर ही सुविधा या रुग्णालयामध्ये उपलब्ध झाली आहे. त्याचे कौतूकच आहे. मात्र, क्वीन्स रुग्णालयाने गोरगरीबांनाही या अद्ययावत सुविधांचा लाभ द्यावा, अशी सूचना केली. दरम्यान यावेळी बोलताना या रुग्णालयात सर्वांनाच परवडणारे दर असणार आहेत, असे रुग्णालयाच्या संचालिका डॉ. आफ्रिन सौदागर यांनी सांगितले.

शिळ गावात अमारा मेडोज येथे हे रुग्णालय सुरु करण्यात आलेले आहे. शनिवारी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते , मनसेचे आमदार राजू पाटील, मा. खासदार तथा राष्ट्रवादीचे ठाणे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, मा. आ. सुभाष भोईर यांच्या उपस्थितीमध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनानंतर डॉ. आव्हाड यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करुन सर्व सुविधांचा आढावा घेतला. या प्रसंगी डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, मुंब्रासारख्या भागात अशा रुग्णालयाची नितांत आवश्यकता होती. तांत्रिक बाबींबाबत आपण बोलणे संयुक्तिक नसले तरी दक्षिण आशियामधील पहिले पांडा वॉर्मरचे तंत्रज्ञान या रुग्णालयाने येथे आणले आहे, ते कौतूकास्पद आहे. या भागात एनआयसीसयूची गरज होती. ती क्वीन्स रुग्णालयाने पूर्ण केली आहे. मात्र, त्यांनी या पुढे गरीबांनाही या सुविधा मिळतील, याची काळजी घ्यावी.

सिनेअभिनेत्री इशा कोप्पीकर यांनी यावेळी बोलताना महिलांसाठी महिलांनीच रुग्णालय सुरु करावे, ही बाब नक्कीच भूषणावह आहे. त्याबद्दल डॉ. आफ्रिन सौदागर आणि डॉ. सना खान यांचे कौतूकच केले पाहिजे, असं म्हंटले आहे.

दरम्यान, महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या रुग्णालयामध्ये 24 तास एमडी डॉक्टर असणार आहेत. या रुग्णालयामध्ये रुग्णालयात महिलांच्या प्रसूतीसह, बालविकार, कॅन्सर आदी आजारांवर उपचार होणार असून फक्त नवजात अर्भके आणि महिलांनाच या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. फाईव्ह स्टार पद्धतीचे हे रुग्णालय असले तरी त्याचे दर सामान्यांच्या आवाक्यातीलच आहेत, असे या रुग्णालयाच्या संचालिका डॉ. आफ्रिन सौदागर यांनी सांगितले.

Updated : 15 Aug 2021 1:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top