रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता?
ट्रिपल इंजिन सरकार विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात सरकारवर संतापले
X
विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर टोल कशाचा घेता असा संतापजनक सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
थोरात म्हणाले, नाशिक-मुंबई महामार्गाची परिस्थिती वाईट आहे. अडीच तासांच्या प्रवासाला चार ते साडेचार तास लागतात. एका एका जागेवर तासभर प्रतीक्षा करावी लागते. भिवंडी मध्ये तर रस्ता कोणता आणि खड्डे कोणते हे शोधणे मुश्किल झालेले आहे. भिवंडीतली वाहतूक कोंडी जीवघेणी ठरते आहे. या महामार्गावर झालेल्या खड्यांबद्दल कोणीही चकार शब्द बोलायला तयार नाही, टोलची वसुली मात्र बिनबोभाट सुरू आहे. हीच परिस्थिती राज्यातल्या सगळ्यात महामार्गांची झालेली आहे. जनमानसात असंतोष वाढत आहे.
थोरात म्हणाले, अधिवेशनादरम्यान नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खड्डे यांच्यावर काँग्रेसने आवाज उठवला. मंत्री महोदयांनी तातडीने त्यावर कारवाई करतो असे आश्वासनही दिले, मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितले होते, मात्र वाहतूक कोंडीत सुधारणा होण्याऐवजी वाढ झालेली आहे.