पत्रकारिता क्षेत्रातील दीपस्तंभ हरपला!
X
मराठी पत्रकारितेतील पहिली महिला पूर्णवेळ वार्ताहर ,पहिली राजकीय वार्ताहर, सांस्कृतिक वार्तांकनकार , 'चित्र पश्चिमा' या सदराच्या कर्त्या, वृत्तपत्रविद्या अध्यापिका,मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता वर्गाच्या माजी वर्गसमन्वयक, पत्रकारितेतील आणि साहित्यातील डझनावारी मानसन्मान ज्यांच्या नावावर आहेत अशा नीला उपाध्ये मॅडम आज आपल्यात नाहीत, हे वास्तव स्वीकारणे जड जात आहे..
येत्या 14 नोव्हेंबर रोजी त्यांना वयाची 80 वर्षे पूर्ण होणार होती.. मूळच्या शीव चुनाभट्टी इथल्या गायकर पाटील या आगरी कुटुंबात जन्मलेल्या, बातमीदारी चे काम हे केवळ पुरुषांसाठी राखीव क्षेत्र असणाऱ्या काळामध्ये, सन १९७० मध्ये ‘दैनिक महाराष्ट्र टाइम्स’ सारख्या प्रतिष्ठेच्या वृत्तपत्रात आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर आणि जबर मेहनत करून नाव कमावणाऱ्या ‘नीला उपाध्ये’ या नावाच्या कार्यकर्तृत्वाची ओळख उभ्या महाराष्ट्राला तर आहेच, पण रायगड, पनवेलकरांना ती काकणभर जास्तच आहे. प्रवाही, संवादी भाषाशैली, आत्मप्रतिष्ठा आणि समानतेचा आग्रह धरणाऱ्या जीवनमूल्यांना शब्दबद्ध करणारे साहित्य लेखन ही त्यांची साहित्य क्षेत्रातली ओळख! पत्रकारितेत विविध लेख लिहिताना वाचकांच्या वैचारिक आकलनाचा परीघ व्यापक करणारी, तरीही ओघवती भाषाशैली, समिक्षणातील शास्त्रशुद्ध काटेकोरपणा हे त्यांचे लेखन विशेष! मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेअंतर्गत पत्रकारिता अध्यापन वर्ग त्यांनी लेकराप्रमाणे वाढवला घडवला आणि मोठा केला.. याशिवाय या वर्गाचा लाभ पनवेल, रायगड भागातील सामान्य, होतकरू तरुणांना व्हावा या उद्देशाने पनवेलच्या ‘चांगू काना ठाकूर’ महाविद्यालयात तो आठ वर्षे त्यांनी चालवला.
'मी जन्माने आगरी आहे' हे त्या अगदी अभिमानाने ठासून सांगत आणि याच जाज्वल्य अभिमानातून त्यांनी आगरी समाजाच्या पूर्वेतिहासाची मांडणी करणारा 'चुनाभट्यांचा इतिहास ' हा अभ्यास पूर्ण ग्रंथ दोन वर्षांपूर्वी सिद्ध केला होता. या ग्रंथाचे लेखन एखाद्या इतिहासकाराने करावे इतके चपखल करण्याचे काम नीला उपाध्ये मॅडम यांनी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया कडून त्यांना हाच ग्रंथ इंग्रजीतून सिद्ध करण्याची विनंती करण्यात आली होती. वयाच्या पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावर असताना आपल्या हातून हे इतके मोठे सन्मानाचे कार्य पूर्ण होण्याचे संचित ईश्वरानेच निर्माण केले आहे ,हा विचार करून त्या झटून इंग्रजी पुस्तक लिहिण्याच्या कामाला लागल्या होत्या. बाहेरचं अवघं जग कोरोना च्या प्रादुर्भावाने ठप्प झालेले असताना नीला मॅडम मात्र सुसाट वेगाने हा ग्रंथ सिद्ध करण्याच्या मागे होत्या. अविश्रांत मेहनत घेऊन त्यांनी हा ग्रंथ मागच्या वर्षी प्रकाशनासाठी सिद्ध केला. या वयात शारीरिक व्याधी, दुखणे ,नकारात्मकता ,मनावर होणारे आघात, या विचारांची जळमटं झाडून झटकून त्या रोज विजेच्या वेगाने आपल्या लेखन कार्यात गुंगलेल्या असायच्या.. वयाची 80 वर्ष हा त्यांच्यासाठी फक्त एक आकडाच होत्या, हे त्या शेवटपर्यंत सिद्ध करत राहिल्या..
आठवड्याला किमान तीन पुस्तके वाचावीत आणि वर्षाला किमान एक पुस्तक लिहावे, हा संदेश त्या त्यांच्या विद्यार्थ्यांना सतत द्यायच्या आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात हे त्या कसोशीने पाळायच्या. त्यांची ही धडाडी आणि कार्यक्षमता आम्हा तरुणांना लाजवणारी होती.
मराठी भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या नीलामॅडम या शुद्धलेखनाच्या बाबतीत देखील तितक्याच काटेकोर होत्या.. बातमीच्या कॉपी वर स्कॅनर प्रमाणे त्यांनी एक नजर फिरवली की, त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुका त्यांच्या नजरेत भरायच्या आणि हातातल्या पेनाने त्या दुरुस्त्या करत सुटायच्या. त्यामुळे त्यांच्यासमोर बातमीची कॉपी ठेवताना अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा यायचा..
रिपोर्टिंग हा विषय त्यांच्याइतका अधिकारवाणीने कोणीच शिकवू शकत नव्हते; कारण महाराष्ट्र टाईम्स सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात ज्यांनी छत्तीस वर्ष रिपोर्टिंग केलं होतं.. त्यांच्या अनुभवाची आणि ज्ञानाची सर अन्य कोणाला येणार?
त्यांच्याशी संपर्कात असणाऱ्या सर्व मान्यवर व्यक्तींना त्यांनी लिहिलेला लेख वाचनात आला की, आठवणीने फोन करून अभिप्राय देणाऱ्या, शिवाय विविध वृत्तपत्रांमधून कोणती तरुण मंडळी उत्तम लिखाण करतात ,याचाही लेखाजोखा आपल्या डायरीत टिपून ठेवणाऱ्या, त्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक शोधून त्यांना 'छान गोळीबंद लिहिले आहेस' असा अभिप्राय देणार्या, स्वतः इतक्या ज्येष्ठ असूनही, आम्हा नुकत्याच या क्षेत्रात पाय रोवू पाहणाऱ्या, त्यांच्या अनुभवा इतकं वयही नसणाऱ्या आम्हा पत्रकारांना केलेल्या लेखनाच्या बाबतीत दिलखुलासपणे दाद देणाऱ्या बाई म्हणजे एक अनोखं रसायन होतं. मराठीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती कित्येक वर्षे पत्रकारितेत असणाऱ्या अनेकांना माहीत नाही हे ध्यानात आल्यावर त्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर चरित्र ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. आज हा ग्रंथ पत्रकारितेच्या अभ्यासकांना मोलाचा मार्गदर्शक ठरत आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे यांचा वारसा पत्रकार म्हणून आपणच पुढे चालवायला हवा, असा संदेश त्या वारंवार आम्हा पत्रकारांना देत असत. त्यासोबत आपल्याभोवती वावरणाऱ्या सर्वांसाठीच काहीतरी करत असत. कोणी नखभर केलं असेल, तर त्याला आजन्म दुवा देत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्यासोबतच्या सहज संवादात देखील त्यांना असलेली विनोदाची सूक्ष्म जाण आणि स्वतःवरच विनोद करण्याची दिलखुलास वृत्ती दिसून यायची. त्यांचे लेखन म्हणजे नुसता शब्दांचा फुलोरा नसे,तर प्रत्येक शब्द हा अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भ वाचकांना सहज समजावेत अशा उद्देशाने निवडलेला असायचा. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांनी निवडलेल्या अभ्यास विषयासंबंधी वृत्तपत्रातली कात्रण हातावेगळी ठेवून अगदी कितीही दिवसांनी वर्गात विद्यार्थी भेटला तरी त्याला ते संदर्भ लेख उपलब्ध करून देणे, या त्यांच्या मार्गदर्शक वृत्तीला तोड नाही. त्यासाठी या वयात अगदी मागच्या वर्षी पर्यंत देखील दोन खांद्यांवर दोन भल्या मोठ्या बॅगा आत्म निर्धाराने स्वतः सांभाळत त्या वर्गावर येत असायच्या. आपल्या हाता खालून विद्यार्थी घासून-पुसून तयार करून समाजात पाठवायचे, तर त्यांना सतत बौद्धिक खुराक पुरवला पाहिजे, या उद्देशाने अनेक संदर्भपुस्तके, वृत्तपत्रे, मासिके त्यांना देण्यासाठी सोबत बाळगत असत. सतत आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देऊन त्यांची कुवत ओळखून ते कोणत्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतील यादृष्टीने मार्गदर्शन करणे, याबाबतीत बाईंची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. पत्रकारितेच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेचे दिलेले पेपर्स हातात घेऊन त्यावरच त्या विद्यार्थ्याचे सकारात्मक गुण, लेखन कौशल्य, सुधारणा, शुद्धलेखनाच्या चुका असे सर्व काही मांडून जणू काही त्या विद्यार्थ्यांची कुंडलीच मांडण्याचे काम त्यात दरवर्षी नेटाने करत असायच्या. एकेका विद्यार्थ्याची बातमीची कॉपी बघून त्यांना समोरच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत अगदी तात्काळ लक्षात येई. वृत्तपत्रविद्या अध्यापन वर्गात त्यांच्यासोबत विषय शिक्षक म्हणून काम करताना, तर त्यांनी एक पत्रकार शिक्षक म्हणून आपल्या हाताखालून घडणाऱ्या पुढच्या पिढ्यांवर योग्य संस्कार करण्याची आणि पर्यायाने समाजात उत्तम नैतिकता असणारे पत्रकार निर्माण करण्याची भली मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, याची मला वारंवार जाणीव करून दिली. अनेक उत्तमोत्तम पत्रकार या समाजाला देण्याचे कार्य त्या वर्गाच्या माध्यमातून अव्याहतपणे करत राहिल्या. या वर्गातील सर्वच विषय शिक्षकांना तर अनेक बाबतीत त्या ममत्व भावनेने आणि अधिकारवाणीने समजावून सांगत असत. आपल्या गुरु विषयी निरतिशय आदर, गुरु ऋण व्यक्त करण्याची भावना, याबाबतीत तर त्यांच्या कृतज्ञ भावनेला तोड नाही. त्यांना गुरु स्थानी असणारे नवकथाकार अरविंद गोखले यांच्याविषयी आदर भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दी आरंभानिमित्त 'कथाव्रती अरविंद गोखले' हा ग्रंथ सिद्ध करून जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर अनेक महाविद्यालयांतून साहित्यिक कार्यक्रमांतून यांच्या कथांचे वाचन आणि त्यांच्या या आठवणींचा जागर घडवून आणण्याचं काम त्यांनी एक हाती केलं. हे थोडे म्हणून की काय? जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता प्रसंगी पुन्हा 'अनवट अरविंद गोखले' हा आणखी एक ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. या ग्रंथांच्या प्रकाशनामध्ये ग्रंथाली प्रकाशनाचेही त्यांनी खूप मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करताना, कार्यक्रम पार पाडताना त्यांची होणारी लगबग ही मला अत्यंत जवळून अनुभवायला मिळाली. त्यातून एखादे महत्कार्य अनेक व्यक्तींच्या सहकार्याने कसे पार पाडायचे याचे प्रशिक्षण मला मिळत गेले. त्यांनी आजवर सिद्ध केलेल्या पत्रकार दि. वि. गोखले, शांताबाई शेळके, य. दि. फडके, सत्यजित राय सारख्या महनीय व्यक्तींचे वर लिहिलेल्या चरित्र ग्रंथांचा नुसता आढावा घेतला तरीही त्यांच्या कृतज्ञ भावनेची आपणाला ओळख होऊ शकते. अगदी प्रत्येक भेटीच्या वेळी लिखाणाचे पुन्हा नवे उपक्रम हाती घेण्याची वृत्ती, नवनवीन पुस्तके लिहिण्याच्या त्यांच्या नियोजनाविषयी ऐकताना अगदी थक्क होऊन जायला व्हायचं. वयाच्या अंतिम टप्प्यावर गलितगात्र होऊन,भूतकाळातल्या आठवणींचे स्मरण करत, कुढत जगणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आज दृष्टीस पडतात, त्यावेळी सकारात्मक ऊर्जेने आणि समाजासाठी भरीव योगदान द्यावे म्हणून धडपडणाऱ्या मॅडम चे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व मनाला कायम भावत होतं. चांगलं काम केलं की , "शाब्बास! माझीच मुलगी तू!" म्हणणारा आवाज आणि चुकलं की पाठीत धपाटा घालणारा हात, आता माझ्या आयुष्यात आयुष्यातून कायमचा निघून गेला ही टोचणी लागून राहिली आहे.. सर्वांच्या लाडक्या नीला मॅडमना सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
ओम शांती शांती!!!
नम्रता कडू , वृत्तनिवेदिका, आकाशवाणी मुंबई
यांच्या फेसबुक पेजवरून साभार