आम्ही आमच्या आंबेडकरच्या प्रतिक्षेत आहोत, तृतीय पंथीयांची वेदना आणि दुःख
कोरोना काळात तृतीयपंथीयांचं पोट कसं भरतं? सरकारने घोषणा केलेलं पॅकेज कुणाला मिळालं? रस्ते बंद असल्याने ही लोक पोट कशी भरतात. ट्रेनमध्ये एखाद्या तृतीय पंथीय व्यक्तीवर अत्याचार झाला तर तक्रार दाखल होते का? तृतीय पंथीय समाज का आहे, त्यांच्या आंबेडकरांच्या प्रतिक्षेत... वाचा किरण सोनवणे यांचा स्पेशल रिपोर्ट
X
आम्ही आमच्या आंबेडकरच्या प्रतिक्षेत आहोत, हे वक्तव्य आहे. एका तृतीय पंथीय सोनियाचे. मॅक्स महाराष्ट्रने गेल्या वर्षापासून लॉकडाउन लागल्यानंतर ज्या अडीअडचणी आणि संकटांना या वर्गाला सामोरे जावे लागले, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
जगभरात तृतीय पंथीय समाजाला आता एक नवीन ओळख मिळत आहे. मतदानाचा हक्क त्यांना दिला जात आहे. मात्र, समाजाची या वर्गाकडे पाहण्याची मानसिकता अजुनही तिचं आहे. समाजात अनेक तृतीयपंथी व्यक्तीवर अत्याचार होतात, बलात्कार होतात. मात्र, त्यांची तक्रार कोणी दाखल करून घेतं का? सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोक खायला महाग झाली असताना ज्यांना समाजाने नाकरलं आहे. त्यांची परिस्थिती नक्की काय असेल? रस्त्यावर भीक मागून जगणारा वर्ग अशी ओळख असलेला हा समाज सध्या लॉकडाऊनमुळं रस्त्यावर वाहनंच नसल्याने नक्की काय कोणत्या परीस्थितीतून जात आहे. हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही तृतीय़ पंथी व्यक्तींशी संवाद साधला.
महाराष्ट्र लावणी सम्राट पुरस्काराच्या मानकरी विद्या देडे या स्वतः तृतीय पंथीय आहेत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करून त्या उपजीविका करत असतात. या लॉकडाऊनच्या काळात तृतीय पंथीयांची नक्की काय परिस्थिती आहे. या संदर्भात आम्ही विद्या यांच्याशी बातचीत केली आहे...
विद्या देडे म्हणाल्या
''साहेब सरकारने गेल्या लॉकडाउनमध्ये देखील तृतीय पंथीयांना 5000 रुपये मदत देण्याची घोषणा केली. ती 99% तृतीयपंथीयांना मिळाली नाही, आता परत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तृतीय पंथीयांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली, ती देखील आम्हाला मिळणार नाही''.
'गेल्या दीड वर्षात तृतीय पंथीयांचे हाल कुत्रे खात नाहीत' अशी अवस्था आहे असे त्या म्हणाल्या
तृतीय पंथीयांच्या अडचणी बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वात मुख्य अडचण आहे ती म्हणजे ओळखपत्र. आता पर्यंतच्या जनगणनेमध्ये स्त्री आणि पुरुष असे दोनच कॉलम होते. त्यामुळे आमची शिरगणतीच झालेली नाही. त्यासंदर्भात रेकॉर्ड उपलब्ध नाही, आज एकट्या मुंबईमध्ये 8 लाखांच्या आसपास तृतीय पंथीय आहे.
आमच्याकडे ओळखपत्र नाही. आम्ही समाजमान्य नागरिक नाही. त्यामुळे आमच्या अडचणी आणि व्यथ्यांकडे कुणी लक्षच देत नाही. तिचे शब्द समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सांगत होते.
सोनिया म्हणाली की, आम्ही जन्मतः कुणी तृतीयपंथीय आहे. असे आई वडील किंवा नातेवाईकांना समजून येत नाही. मग आम्हाला मुलगा समजून वाढवले जाते. त्यानंतर जसं जसे हार्मोन्समध्ये बदल होतात. तसं तसे आमचे शरीर, आमच्या आवडी निवडी बदलत जातात. आम्हाला मुलीचे ड्रेस, नटणे, साडी घालणे, मेकअप करणे आवडू लागते आणि इथूनच आमच्या व्यथा आणि वेदनांना सुरुवात होते. सुरुवातीला आई वडील समजून सांगतात की मुलगा आहे.
मुलासारखे वाग. मात्र, आई-वडिलांना आम्ही तृतीय पंथीय किंवा किन्नर आहोत हे समजत नाही. यासाठी समाज शिक्षण आणि जागृती होण्याची फार मोठी गरज आहे. कारण हे नैसर्गिक आहे हे समाजात रुजणे आवश्यक आहे.
मात्र, पारंपारिक संस्कृती, धारणा, चित्रपट आणि कथा कादंबरी यातून होणारे चित्रण यामुळे तृतीय पंथीय म्हणजे कमी पणाचे, दोष, कुटुंबावरील डाग आणि अप्रतिष्ठा त्यामुळे सर्वात प्रथम तृतीय पंथीय व्यक्तीचा सर्वात प्रथम घरात अवहेलना होते, त्यानंतर शिक्षणाच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि त्यामुळे एक भिकाऱ्याचे जीवन जगण्याची पाळी तृतीय पंथीयांवर येते. आणि मग त्याच्या व्यथा आणि वेदना वाढतच जातात.
त्याला तृतीय पंथीय समाजाची चौकट स्वीकारावी लागते, त्याला कुणाला तरी गुरू बनवावा लागतो. जो त्याचे सर्व जीवन नियंत्रित करतो. समाज मोकळेपणाने स्वीकारत नाही. त्यामुळे त्याच्याकडे तृतीय पंथीय चौकट स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही.
मग रेल्वेत भीक मागणे, सिग्नलवर भीक मागणे, मूल जन्मले किंवा लग्न सोहळा, बाजारा भीक मागणे किंवा गावोगावी रायरंद बनून फिरणे, वाघ्या मुरळीच्या फडात नाचणे आणि वेश्या व्यवसाय करणे अशी कामे करत जीवन संपवावे लागते.
लता सांगत होती की...
आम्ही बाहेर पडलो की रेल्वेत आम्ही पुरुषांच्या डब्यात चढू शकत नाही, तिथे आमचे लैंगिक शोषण होते किंवा विनयभंग केला जातो त्यामुळे आम्ही महिलांच्या डब्ब्यात बसतो तर तिथेही महिला आमच्या सोबत नीट वागत नाही, हाकलून लावतात.
एखाद्या महिलेची साधी छेड काढली तर पोलीस लोक लगेच त्यांची दखल घेतात, आणि छेड करणाऱ्याला सज्जड दम भरतात किंवा केस करतात. मात्र, आमची रोजच छेड काढली जाते, अत्याचार होतात. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर आमची काही सूनवाई होत नाही, आम्हाला हाकलून दिले जाते, का आम्ही व्यक्ती नाही आहोत का / आम्हाला भावना नाही आहेत का ?
वास्तविक तृतीय पंथीय व्यक्ती सर्व प्रकारची कामे करू शकते. मात्र समाजाने वाळीत टाकल्यामुळे अनेक शिकलेले तृतीय पंथीयांवर भीक मागण्यावाचून पर्याय शिल्लक नाही.
सर्वात प्रथम मध्ये समाजात तृतीय पंथीय मूल जन्माला येणे हे काही पाप, कमीपणाचे आहे ही भावना नष्ट होणे गरजेचे आहे. कुटुंबाने जर आपल्या मुलाला स्वीकारले तर त्यांची 70% अडचणी दूर होतील आणि समाजात जाऊन तृतीय पंथीय म्हणजे नेमके काय? तो शाप देतो किंचा त्याची संगत खराब असते किंवा तो म्हणजे लांच्छन याबाबत जागृती होणे गरजेचे आहे.
एसी एसटी आणि ओबीसी समाजासाठी जसे आरक्षण आहे, तसे ज्याठिकाणी तृतीय पंथीय मोकळेपणाने काम करू शकतील अश्या काही कामे शोधून त्यांच्यासाठी तिथे आरक्षण ठेवले पाहिजे असे मत राणी हिने मांडले
यासाठी आमची जनगणना होणे गरजेचे आहे. आजही 90% तृतीय पंथीयांकडे आधारकार्ड नाही, त्यामुळे रेशन कार्ड नाही, आम्ही भाड्याने रूम घ्यायला गेलो तर आम्हाला कुणी रूम देत नाही आणि रूम दिली तर दुप्पट भाडे मागतात.
त्यामुळे आम्हाला अक्षरश: जगण्याचा वीट आला असून आम्ही देखील आमच्या आंबेडकरच्या प्रतीक्षेत आहोत, जो आम्हाला या शोषणातून मुक्ती देईल.
किरण सोनावणे