Home > News Update > महाराष्ट्र सरकारने तात्काळ सीमाप्रश्नाबाबत उच्चधिकार समितीची बैठक बोलवावी

महाराष्ट्र सरकारने तात्काळ सीमाप्रश्नाबाबत उच्चधिकार समितीची बैठक बोलवावी

महाराष्ट्र सरकारने तात्काळ सीमाप्रश्नाबाबत उच्चधिकार समितीची बैठक बोलवावी
X

बेळगाव : बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक नुकतीच पार पडली, या बैठकीत सध्या सीमाभागात सुरु असलेल्या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न सोडवणुकीसंदर्भात निर्माण केलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक तात्काळ बोलवावी अशी मागणी केली आहे. बैठकीत झालेल्या चर्चेवरून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की , कर्नाटक सरकारने वेळकाढू भूमिका सोडून कर्नाटक विधानसभेत ठराव केल्याप्रमाणे महाजन अहवाल प्रमाणे सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात करावी. त्यावर न्यायालयात योग्य ती बाजू मांडली जाणार आहे. बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ बेळगावात जो असंतोष निर्माण झाला, त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी बंगळूर घटनेचा निषेध नोंदविणाऱ्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला असल्याने याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. त्यासाठीचा सर्व खर्च महाराष्ट्र एकीकरण समिती करेल असा ठराव देखील यावेळी करण्यात आला.

काही लोकांनी महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रतिनिधींकडे आर्थिक मदतीची मागणी केली असली तर महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्व प्रकारच्या आर्थिक बाजू आजपर्यंत सांभाळली असून यापुढे देखील लागणार खर्च समिती करेल असे मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी कळविले आहे.

दरवर्षी प्रमाणे १७ जानेवारी रोजी सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जाणार असल्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसी केंद्राने मान्य केल्याचे वृत्त कळताच १७ जानेवारी १९५६ ला सीमाभागात निर्माण झालेल्या परिस्थितीत ५ जणांना प्राण गमवावे लागले होते. संयुक्त महाराष्ट्र साठी बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांपैकी ५ जण बेळगावचे होते त्यांना दरवर्षी १७ जानेवारी रोजी सीमाभागात श्राद्धांजली अर्पण करत सदर दिवस गांभीर्याने पाळला जातो.

Updated : 4 Jan 2022 5:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top