देशातील पहिला 10 हजार लसीकरणाचा 'लस महोत्सव' दिव्यात घेण्यात आला
X
ठाणे : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच महात्मा गांधी जयंतीचे औचित्यसाधत ठाण्यातील दिवा येथे देशातील पहिल्या सुमारे 10 हजार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या 'लस महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत या लस महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्राधान्य देत , ठाणे महापालिकेच्यावतीने एकाच वेळी तब्बल 10 हजार लसीकरणाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आहे, या लस महोत्सवाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा सुनिता मुंडे, आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की,दिवा प्रभागात आरोग्य केंद्र व बसेसच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. परंतु देशात पहिल्यांदाच एकाच वेळी अशा पद्धतीने जवळपास 10 हजार लसीकरण महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन दिव्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असून नागरिकांचे लसीकरण देखील वेळेत पूर्ण व्हावे यासाठी हा भव्य लसीकरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
तर यावेळी शहरात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य महापालिकेने ठेवले असून त्याचाच एक भाग म्हणून 10 हजार लस देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला असल्याचे विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.