अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने सांगली- कोल्हापूरला दिलासा
X
राज्यात सध्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: दाणादाण उडालेली पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यातच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी सांगली- कोल्हापूरला पूराचा मोठा फटका बसला होता. अनेकांना या महापुरामुळे आपला जीव गमवावा लागला होता. अनेकजण बेघर झाले होते. त्यावेळी कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून वेळेत विर्सग सुरू न केल्याने हा महापूर आला होता.
मात्र, यंदा महाराष्ट्रातील जोरदार पावसाच्या पार्श्वभुमीवर कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याची माहिती आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.त्यामुळे कोल्हापूर - सांगलीला दिलासा मिळाला आहे. कर्नाटकात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. दोन वर्षापुर्वी या धरणातून पाणी पुढे न सोडल्यामुळे कृष्णेने महाराष्ट्रातील सांगलीत थैमान घातलं होतं. लाखो पूरग्रस्त आणि हजारो जनावरांचं त्यावेळी पुनर्वसन करण्यात आलं होतं.
सध्या राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली – कोल्हापूरकरांना धडकी भरली होती मात्र, अलमट्टी धरणातून विर्सग वाढवल्याने सांगली- कोल्हापुरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.