'तीस-तीस' घोटाळ्यात सापडलेली 'डायरी' राजकीय भूकंप आणणार
X
गेली दहा महिने सतत पाठपुरावाकरून Max Maharashtra ने उघड केलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यात नवनवीन माहिती समोर येत आहे. तर यासर्व घोटाळ्याच्या मास्टर माईंड संतोष उर्फ सचिन राठोड याच्या घराची झाडाझडती घेतली असता पोलिसांना महत्वाचे पुरावे सापडले असून ज्यात आमदार,खासदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
2016 पासून सुरू असलेल्या 'तीस तीस' योजनेत 2018 नंतर लोकांनी मोठी रक्कम गुंतवणूक केली होती.विशेष म्हणजे यात सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व घोटाळ्याची Max Maharashtra ने सर्वात आधी 8 फेब्रुवारी 2021 लाच पोलखोल केली होती. तसेच गेली 10 महिने या घोटाळ्याचा पाठपुरावा सुद्धा केला.
मात्र तक्रार केल्यानंतर पैसे बुडतील या भीतीने गुंतवणूकदार पुढे येत नव्हते.पण एका महिलेने हिम्मत करत औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि 'तीस-तीस'च्या म्होरक्या संतोष राठोडवर गुन्हा दाखल झाला. आता पोलीस याप्रकरणी तपास करत असून,यात अनेक मोठ्या नेत्यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे.
राठोड याचाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कन्नड आणि औरंगाबाद शहरातील घराची झाडाझडती घेतली. ज्यात पोलीसांना अनेक नेते, अधिकारी यांच्या नावाच्या चिठ्या असलेली डायरी सापडली आहे. विशेष म्हणजे यात असलेल्या नेत्यांची नावं समोर आल्यास मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासदार आणि आमदारसह एका माजी मंत्र्यांचं सुद्धा यात नाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस तपासात आणखी काय-काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मास्टरमाइंडला लूकआऊट नोटीस बजावणार
'तीस-तीस' घोटाळ्यात औरंगाबाद पोलीस अधीक्षक निमित गोयल हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. तर लवकरच या घोटाळ्याचा मास्टरमाइंडला लूकआऊट नोटीस बजावणार असल्याची माहिती सुद्धा पोलीस अधीक्षक गोयल यांनी दिली आहे.