कोरोनाचा मराठी साहित्य संमेलनाला फटका : स्थगित करण्याचा निर्णय
राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे.
X
94 वे साहित्य संमेलन 26, 27, 28 मार्च रोजी नाशिकमध्ये होणार होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी आवर्जून सांगितलं आहे.
रोनामुळे साहित्य संमेलन यावर्षी घ्यायचेच नाही असं महामंडळाने ठरवलं होतं. मात्र नोव्हेंबर 2020 च्या मध्यापासून कोरोनाची लागण कमी कमी होत गेली. डिसेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आली होती. त्यामुळे साहित्य रसिकांची मागणी लक्षात घेत साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचं संक्रमण पुन्हा वाढल्याने साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे. या आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही म्हणून कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावर नाशिकच्या स्वागतमंडळाला साहित्य महामंडळाशी चर्चा करून हे संमेलन घेता येईल असेही कौतिकराव ठाले पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र स्थगित संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यात कोणताही बदल केला जाणार नाही. हे संमेलन मे 2021 च्या आत स्वागतमंडळाने घ्यावे अशी महामंडळाची अपेक्षा आहे.
94 व्या साहित्य संमेनलानाची तयारी जोरदार सुरु होती. निधी संकलन आणि इतर तयारीला वेग आला होता. मात्र कोरोनाने डोकं वर काढलं. साहित्य महामंडळाने नाशिकमध्ये कोरोना कमी होण्याची पुरेशी वाट पाहिली, मात्र कोरोनाचा प्रसार कमी होण्याची चिन्ह दिसत नसल्याने संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. संमेलन अध्यक्ष, साहित्य संस्थाचे प्रमुख पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं.
साहित्य संमेलन ऑनलाईन होऊ शकत नाही. ऑनलाईन संकल्पनेत साहित्य संमेलन बसत नाही, असं मला वाटतं. ऑनलाईन एखादा परिसंवाद, चर्चा, भाषण इत्यादी गोष्टी करता येतील. मात्र तिथे समुहाने येऊन आनंद घेता येणार नाही. ऑनलाईन उपक्रमांचं स्वागत करु मात्र संमेलन ऑनलाईन घेता येणार नाही, असं कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं.