मरणानंतरही अनंत यातना; नदीच्या पात्रातून अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावा लागला मृतदेह
X
बुलडाणा : जीवन जगतानाही यातना आणि या जगाचा निरोप घेतल्यावरही नशिबी यातनाच, असाच काहीसा प्रकार शेगाव तालुक्यातील महागाव येथुन समोर आला आहे. पूल नसल्याने पाण्यातून रस्ता ओलांडणाऱ्या इसमाचा ११ सप्टेंबर रोजी पाय घसरून, यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे काल सायंकाळी निधन झाले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी या युवकाचा पाय घसरून अपघात झाला होता, त्याच ठिकाणावरून इसमाचा मृतदेह उचलून नेण्याची वेळ आली आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना अक्षरश: तीन फुट पाण्यातून जावे लागले. या घटनेमुळे या भागातील रस्ते व पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जिल्ह्यातील महागाव आणि जवळा पळसखेड गट ग्रामपंचायत असून दोन्ही गावांच्या मध्यावरून बोर्डी नदी वाहते. या गावातील सर्व व्यवहार, दवाखाने, किराणा दुकाने हे जवळा पळसखेड आणि जवळा बु. या गावात आहे. त्यामुळे महागाववासियांना सर्वच कामांसाठी नदी ओलांडून या गावांमध्ये जावे लागते. मात्र, पावसाळ्यात महागाव या गावाचा बाजूच्या गावांशी नदीमुळे संपर्क तुटतो. या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी वर्षनुवर्षाची आहे. ११ सप्टेंबर रोजी उमेश महादेव डाबेराव या युवकाचा पाय घसरला आणि तो पडला यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे काल सोमवारी सायंकाळी निधन झाले.
दरम्यान या युवकाच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांना अक्षरश: तीन फुट पाण्यातून जावे लागले. सध्या नदीवर पूल नसल्याने गावकरी शालेय विद्यार्थी, महिला वयोवृद्ध नागरीक या सगळ्यांनाच जीव धोक्यात घालून नदीमधून प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही पूल होत नसल्याने गावकरी हतबल झाले आहेत. येथील गावकरी गेली अनेक वर्षांपासून हा जीवघेणा प्रवास करत आहेत. या प्रवासाला आता गावकरी कंटाळले असून राज्य सरकारने त्वरीत रस्ता तयार करावा अन्यथा गांधी जयंती पासून सर्व गावकरी आमरण उपोषण करतील असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. या घटनेमुळे या भागातील रस्ता व पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.