शांतीश्री पंडित JNU च्या नव्या कुलगुरू, नियुक्तीला तीव्र आक्षेप
देशाच्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत असलेल्या जेएनयू विद्यापीठातील कुलगुरूंच्या नियुक्तीवरून मोठे वादंग निर्माण झाले आहे.
X
देशातील गुणवत्ता यादीत सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत वरच्या स्थानी असलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कायम चर्चेत असते. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वादग्रस्त ठरलेल्या व राजकारण आणि सार्वजनिक प्रशासन विभागाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची जेएनयूच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावरून त्यांचे ट्वीट शेअर करत शांतीश्री पंडित यांच्या नियुक्तीवरून संताप व्यक्त केला जात आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू जगदेश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने रिक्त झालेल्या जागेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राजकारण आणि सामान्य प्रशासन विभागाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र शांतीश्री पंडित यांनी शेतकरी आंदोलन आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या नरसंहाराचे ट्वीटरवरून समर्थन केले होते. त्यासंदर्भातील ट्वीट शेअर करून पत्रकारांनी शांतीश्री पंडित यांच्या नियुक्तीवर संताप व्यक्त केला. त्यानंतर शांतीश्री पंडित यांनी आपले ट्वीटर अकाऊंट डिलीट केले.
शांतीश्री धुलीपुडी पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजकारण आणि सामान्य प्रशासन विभागात प्राध्यापिका होत्या. तर त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे उघडपणे समर्थन केले होते. त्याबरोबरच विविध घटनांवर वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यावरून देशातील पत्रकारांनी त्यांचे ट्वीट शेअर करत त्यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेएनयुचे वादग्रस्त कुलगुरू जगदेश कुमार यांची युजीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ७ फेब्रुवारी रोजी जेएनयूच्या कुलगुरूपदी पुणे विद्यापीठातील राजकारण आणि सामान्य प्रशासन विभागाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र शांतीश्री पंडित यांनी उघडपणे हिंदुत्ववादी विचारसरणीचे समर्थन करत ट्वीटरवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्या नियुक्तीचा विरोध केला जात आहे.
जेएनयूत मोठ्या प्रमाणावर उजव्या विचारसरणीच्या समर्थकांचा भरणा करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थक असलेल्या शांतीश्री पंडित यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आल्याने होत असलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले. तर कंगणा रनौतच्या वादग्रस्त विधानानंतर ट्वीटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. त्यावेळी टाइम्स नाऊचे संपादक राहुल शिवशंकर यांनी कंगना राणौतच्या ट्विटर हँडलच्या निलंबनाचा निषेध करणाऱ्या टिप्पणीला उत्तर म्हणून शांतीश्री पंडित यांनी डाव्या-उदारमतवाद्यांवर "जिहादी" असे म्हणत हल्ला चढवला होता. तर महात्मा गांधींच्या हत्येला दुःखद असे संबोधतानाच त्यांच्या हत्येचे समर्थन करत अखंड भारतासाठी फक्त गांधींची हत्याच उपाय होता, अशा आशयाची टिपण्णी केली होती. याबरोबरच मानवी हक्क कार्यकर्त्यांवर टीका करताना मानसिकदृष्ट्या आजारी जिहादी असे म्हटले होते.
शांतीश्री पंडित यांनी जेएनयूमधील डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना नक्षली जिहादी असे संबोधले होते. याबरोबरत देशातून रोहिंग्या मुस्लिमांना हाकलून देण्याची आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि सेंट स्टीफन्स कॉलेजचा निधी थांबवण्याचे शांतीश्री पंडित यांनी आवाहन केले होते. तसेच लव्ह जिहाद रोखण्यासाठी गैर मुस्लिमांनी जागे व्हावे, असे वादग्रस्त मत शांतीश्री पंडित यांनी केले होते.
शेतकरी आंदोलनावर बोलताना आंदोलनजीवी मध्यस्थ दलाल अशा शब्दात शेतकरी आंदोलनावर मत व्यक्त केले होते. तर शाहीन बाग येथे नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शकांवरही टीका केली होती. तर द वायरच्या संपादक अरफा खान आणि ऑड्रे ट्रुशके यांच्यावरही खालच्या पातळीवरची टिपण्णी केली होती. तर नियुक्तीनंतर शांतीश्री पंडित यांनी केलेले वादग्रस्त ट्वीट शेअर करण्यात येत होते. त्यामुळे अखेर शांतीश्री पंडित यांनी आपले ट्वीटर अकाऊंट डिलीट केले.
शांतीश्री पंडित यांनी 2002 ते 2007 या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या संचालक असताना भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पुणे विद्यापीठाचे तात्कालिन कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी सुनंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. तर त्यामध्ये शांतीश्री पंडित यांनी नियमांचे पालन न करत पीआयओ कोट्यात अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तर याबाबतचे आरोप सगळ्यात आधी सिनेट सदस्य अतुल बागुल यांनी केले होते. तसेच त्यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यामध्ये 50-60% अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबरोबरच शांतीश्री यांनी आर्थिक लाभ घेतल्याची कबुलीही दिली. मात्र 2008 साली कुलगुरू बदल्याने नवे कुलगुरू रघुनाथ शेवगावकर यांनी शांतीश्री पंडित यांच्याविरोधात कठोर कारवाई केली नाही. त्यानंतर निवृत्त न्यायमुर्ती जे.ए. पाटील यांचा समावेश असलेल्या समितीनेही शांतीश्री पंडित यांना चुकीच्या प्रवेशासाठी दोषी ठरवले. मात्र पुणे विद्यापीठाने फक्त शांतीश्री पंडित यांचे वेतन रोखून सौम्य कारवाई केली. त्यामुळे पंडित यांचे कारकीर्द डागाळलेली असतानाही त्यांची नियुक्ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केल्याने केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयावर प्रश्न उपस्थित होत आहे.
जगदेश कुमार यांच्या कार्यकाळात एकीकडे विद्यार्थी- प्राध्यापक तर दुसरीकडे विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यात मोठे वाद झाले आहेत. तसेच विद्यापीठात प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. तर शातीश्री पंडित या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनणार आहेत. मात्र शांतीश्री पंडित यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या उजव्या विचारसरणीमुळे पक्षपातीपणा निर्माण होऊन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मोठे वादंग निर्माण होऊ शकते. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला हानी पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.