युवांना मिळणार त्यांच्या प्रश्नासाठी व्यासपीठ...
युवांच्या सहभागातून २०३५ मध्ये महाराष्ट्राच्या अमृतमहोत्सवी वर्षात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेण्याचा मानस...
X
महाराष्ट्रातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही ४० वर्षाखालील नागरिकांची असली तरी सार्वजनिक धोरण-निर्धारण यंत्रणेत युवांचा सहभाग अत्यल्प आहे. विधिमंडळ आणि संसदेतही ४० वर्षांखालील लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधीत्वही कमीच आहे. त्यामुळे शासन आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेत याच युवांनी अधिकाधिक योगदान देऊन महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी 'महाराष्ट्र व्हिजन फोरम' (MVF) ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज पुणे (Pune) येथे पुणे युथ क्लब (Youth Clube) मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. मात्र, SDG इंडिया इंडेक्स – २०२० (क्रमांक ९), सामाजिक प्रगती निर्देशांक (क्रमांक २९) अशा विविध निर्देशांकामधून महाराष्ट्र बाहेर पडला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही ४० वर्षाखालील युवांची आहे. मात्र, सार्वजनिक धोरण आणि नियंत्रण या यंत्रणेत युवा वर्गाचा सहभाग हा अत्यल्प आहे. तर दुसरीकडे संसद आणि विधिमंडळांमध्येही या वर्गाचे प्रतिनिधीत्व कमीच आहे. शासन आणि धोरणनिर्मितीच्या प्रक्रियेत युवा वर्ग आपले योगदान देऊ शकेल, असे कोणतेही व्यासपीठ महाराष्ट्रात उपलब्ध नव्हते, त्यामुळे ही उणीव भरून काढण्याचे काम महाराष्ट्र व्हिजन फोरम (maharashtra vision forum) करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
२०३५ मध्ये महाराष्ट्र राज्याचा ७५ वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनापर्यंत सर्वसमावेशक शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यातील युवांच्या सहभागातून अजेंडा तयार करण्याचा महाराष्ट्र व्हिजन फोरमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी युवांच्या सृजनशील विचारांचा उपयोग करणे हे या फोरमचे उद्दिष्ट असेल.
असा असेल फोरमचा कार्यक्रम
आजपासून (१२ जानेवारी ) या फोरममध्ये सदस्य नोंदणीला सुरूवात करण्यात आली आहे. www.mahavisionforum.com या वेबसाईटवर जाऊन सदस्य नोंदणी करता येणार आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, क्रीडा, प्रादेशिक असमतोल, भूक, पिण्याचे पाणी, ऊर्जा, उद्योग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे कल्याण, गरीबी, स्वच्छता, वातावरणीय बदल, संस्कृती -पर्यटन, वायू प्रदुषण, लैंगिक समानता, गृहनिर्माण, रोजगार, कायदा-सुव्यवस्था अशा १९ विषयांवर राज्यातील युवकांना नागरिकांना मतदान करता येईल. याविषयांव्यतिरिक्त कुणाला वेगळ्या विषयासंदर्भात काही सुचवायचे असेल तर तसा पर्यायही देण्यात आला आहे. १२ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत याविषयावर मतदान करण्यासाठी वरील वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. त्याशिवाय एखाद्या प्रश्नासंदर्भात माहिती देऊन त्यावर उपाययोजना काय असाव्यात हे देखील सांगण्याची मूभा या फोरममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. १२ जानेवारी ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर विविध विषयांवरील आपले म्हणणे आणि उपाययोजना फोरममध्ये अपलोड करायच्या आहेत. लोकांनी फोरमच्या वेबसाईटवर जाऊन मांडलेल्या प्रश्नांमधून महाराष्ट्रासमोरील प्राधान्याचे प्रश्न व्हिजन डॉक्यूमेंट द्वारे समोर येणार आहे.
महाराष्ट्र दिनी व्हिजन डॉक्यूमेंट सादर होणार
१ मे २०२३ रोजी पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील युवावर्गाने फोरममध्ये सहभागी होऊन केलेले मतदान, मांडलेले प्रश्न आणि उपाययोजना यावर विचारमंथन होऊन त्याचं व्हिजन डॉक्यूमेंट सादर केले जाणार आहे. हे व्हिजन डॉक्यूमेंट तत्कालीन सरकारलाही सादर केले जाणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. चित्रपट दिग्दर्शक-निर्माते नागराज मंजुळे, चेतना सिन्हा, प्रदीप लोखंडे, ॲड. अनिकेत निकम क्रिकेटपटू केदार जाधव, सतीश मगर, माजी सनदी अधिकारी डॉ. महेश झगडे, विलास शिंदे, हमीद दाभोलकर, नरेश बोडखे, मनोज शिंदे आणि आनंद मेणसे असे जवळपास १५ मेन्टॉर (मार्गदर्शक) या फोरमसाठी व्हिजन डॉक्यूमेंट तयार कऱण्याचे काम करणार आहेत. या मार्गदर्शकांमध्ये भविष्य़ात वाढ होणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. हे फोरम पूर्णपणे अराजकीय असून महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी लोकांसाठी तयार केलेले हे व्हिजन डॉक्यूमेंट असेल जे सत्ताधा-यांना महाराष्ट्रासंदर्भातील धोरणांची आखणी, अंमलबजावणी करतांना उपयोगी ठरू शकेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
रोहित पवार यांचा प्रवास युवांसाठी प्रेरणादायी
२०१७ मध्ये पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून येत रोहित पवार यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवून ते विधानसभेत पोहोचले. राजकारण आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रातील त्यांचा प्रवास हा युवांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे युवाशक्तीच्या सहभागातून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र व्हिजन फोरमने हे आश्वासक पाऊल टाकलेले आहे.