Home > News Update > औरंगाबादेतील अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर आजपासून मदत जमा होणार ; 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत

औरंगाबादेतील अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर आजपासून मदत जमा होणार ; 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत

औरंगाबादेतील अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर आजपासून मदत जमा होणार ; 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत
X

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या (Heavy rain)अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 7 लाख 4 हजार 280 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांचे 5 लाख 24 हजार 655 हेक्टरावरील खरीप पीक पूर्णपणे बाधित झाले होते. या नुकसानीची (Crop loss) भरपाई म्हणून राज्य शासनाकडून जिल्ह्याला 416 कोटी 54 लाख 61 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी आजपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने तर हातातोंडाशी आलेले खरीपाचे पीक पूर्णपणे वाहून गेले. काही ठिकाणी तर जमिनीच खरडून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने NDRF च्या निकषापेक्षा जास्त वाढीव मदत जाहीर केली. त्यातील 75 टक्के रक्कम जिल्ह्यांना वितरीतही केली आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्याला 416 कोटी 54 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालयांना गुरुवारी वितरीत करण्यात आला.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. शुक्रवारपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकते, मात्र असे असले तरीही ज्या तालुक्यांनी लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे, तेथे आजपासूनच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

Updated : 29 Oct 2021 5:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top