'टीईटी' गैरव्यवहार प्रकरणी तुकाराम सुपे यांच्यासह १५ जणांवर आरोपपत्र दाखल
X
राज्यातील बहुचर्चीत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक, सनदी अधिकारी सुशील खोडवेकर, शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह १५ आरोपींवर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात सायबर गुन्हे शाखेने दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सायबर गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र तीन हजार ९९५ पानी आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने आणि कागदपत्रांमधून सबळ पुरावा उपलब्ध झाला असल्याचे सायबर पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर, तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, दलाल अंकुश हरकळ, संतोष हरकळ, अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, सुनील घोलप, मनोज डोंगरे, सुरजित पाटील, स्वप्नील पाटील, राजेंद्र साळुंके, मुकुंदा सूर्यवंशी यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले.