अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर गेवराईत तहसीलदारांची आढावा बैठक संपन्न
X
बीड : बीड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून सर्वदूर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊसाचा जोर हा अधिक असल्याने जिल्ह्यातील अनेक भागांसह गेवराई तालुक्यातील बऱ्याच महसुली मंडळात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले झाले आहे. खरिपांच्या पिकांमध्ये अक्षरक्ष: पाणी साचल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
तर तालुक्यातील राजापुर गावाला पाण्याने वेढा बसला होता, रोहीतळ गावांमध्ये पाणी शिरले होते. यात घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानी संदर्भात तहसीलदार सचिन खाडे यांनी महसूल व कृषी विभागाची तातडीची बैठक घेत प्रशासनाला आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत.
शासन नियमाप्रमाणे चोवीस तासांत 65 मिली मीटर पाऊस झाल्यास अतिवृष्टी गनली जाते, गेवराई तालुक्यामध्ये गेल्या चोवीस तासांत 102 मिली मीटर इतका पाऊस झाला असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. अतिवृष्टी झाल्याने अनेक नद्यांना , ओढ्यांना पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने त्याठिकाणी न जाण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी नानासाहेब पवार या शेतकऱ्याने केली आहे. आधीच कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.त्यातच अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे.