पगारासाठी शिक्षकांचे आमरण उपोषण, संस्थाचालकांनी पगार न देता काढल्याचा आरोप
X
एकीकडे लॉकडाऊनच्या काळात अनेक शिक्षकांवर पोट भरण्यासाठी इतर किरकोळ व्यवसाय करण्याची वेळ आली. तर दुसरीकडे पनवेलमध्ये अनेक महिन्यांपासून पगार नसल्याने शिक्षकांवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. न्यू जय भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शांती निकेतन पॉलिटेक्निक कॉलेजचे शिक्षक आमरण उपोषणाला बसले आहेत. 2012 पासून येथील शिक्षकांना संपूर्ण वेतन मिळालेले नाही आणि गेल्या सात महिन्यांपासून संपूर्ण वेतन बंद झाले असल्याचा त्यांचा आऱोप आहे. भाजप आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पुनम पवार ह्या संबंधित संस्थेच्या अध्यक्ष आहेत.
यासंदर्भात आम्ही शाळेच्या प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच आमदार राजेश पवार आणि संस्थेच्या अध्यक्षांनाही संपर्क केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर संस्थेचे सदस्य योगीराज कदम यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली. शिक्षकांचा सर्व पगार देण्याची संस्थेची तयारी आहे, पण कोरोना काळातील पगाराबाबत संस्थेने या शिक्षकांनी नेमके काय शिकवले त्याची माहिती द्यावी अशी अट घातली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच तीन सदस्यीय समिती आता या शिक्षकांनी भेट घेणार असून यावर लवकरच तोजगा निघेल असेही त्यांनी सांगितले. शिक्षकांचे कोणतेही पैसे बुडवले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण या शिक्षकांना नोकरीवरुन काढून टाकल्याचा आरोप केला आहे, त्याबद्दल मात्र योगीराज कदम यांनी कोणतीही माहिती दिली नाही.