भारताबाबत तालिबानने जाहीर केली भूमिका !
X
अफगाणिस्तानमध्ये सरकारी फौजा आणि तालिबान यांच्यातील संघर्ष अंतिम टप्प्यात आला आहे. तालिबानने आणखी आक्रमक होत आता कंदाहारसह 4 शहरांवर ताबा मिळवला आहे. तालिबानने काबूल ताब्यात घेण्याची तयारी केली आहे. अफगाणिस्तानातील अनेक मोठी शहरं आणि तिथल्या 34 प्रांतांपैकी 50 टक्के प्रांतांच्या राजधान्यांची शहरं बंडखोरांनी ताब्यात घेतली आहेत. एकीकडे तालिबनाने मोठ्या प्रमाणात वर्चस्व प्रस्थापित केले असताना भारताबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद सुहेल शाहीन याने एएनआय या वृत्तसंस्थेला फोनवरुन दिलेल्या माहितीनुसार तालिबानची भारताशी सहकार्य करण्याची तयारी आहे. अफगाणिस्तानातील लोकांना आणि राष्ट्रीय प्रकल्पांसाठी भारताने मदत केली आहे. भारताने याआधी केलेली ही मदत स्वागतार्ह आहे. पण भारताने अफगाणीस्तानात आपले सैन्य पाठवू नये असा इशाराही त्याने दिला आहे.
"अफगाणिस्तानची आर्थिक भरभराट आणि विकासासाठी भारतातर्फे मदत केली जात आहे. देशातील धरणं, पाय़ाभूत सुविधा प्रकल्प, तसेच अफगाणिस्तानच्या जनतेच्या हितासाठी भारताच्या या सहकार्याचे आम्ही स्वागत करतो. आमच्यातर्फे परदेशी दुतावास आणि त्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणताही धोका नाही. तसेच कोणत्याही दुतावासाला किंवा कर्मचाऱ्यांना आम्ही लक्ष्य करणार नाही, असे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे" अशी भूमिका शाहीन याने मांडली.
अफगाणिस्तानात उपस्थित असलेल्या इतर देशांच्या सैन्याची काय अवस्था झाली आहे यावरुन भारताने धडा घ्यावा, असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे. भारताच्या शिष्टमंडळाशी तालिबानची चर्चा सुरू आहे का, या प्रश्नावर शाहीन याने सांगितले की, "अशी चर्चा सुरू असल्याचे खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही बैठक झालेली नाही. पण शुक्रवारी दोहा इथे आमची बैठक झाली, त्यामध्ये भारताचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते" अशी माहिती त्याने दिली आहे.
अफगाणिस्नातच्या धरतीचा वापर भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ शकतो का, या प्रश्नाला उत्तर देताना शाहीन याने सांगितले की, "अफगाणिस्तानच्या धरतीचा वापर शेजारील देशांसह इतर कोणत्याही देशाविरुद्ध होऊ द्यायचा नाही, हे आमचे सर्वसाधारण धोरण आहे."
पाकिस्तानातील दहशतावादी संघटनांसोबत तालिबानचे संबंध असल्याचा आरोपावर त्यांनी सांगितले की, हे सर्व आऱोप निऱाधार आहेत आणि आमच्या विरुद्धच्या पूर्वग्रहामुळे असे आरोप केले जातात, असा दावा शाहीन याने केला आहे.