बारावीतील आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन
X
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सानेगाव येथे एका आदिवासी आश्रमशाळेत बारावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील प्रवेश बांगारे या विद्यार्थ्याचा 04 मार्च रोजी संशयास्पद मृत्यू झाला. ही आत्महत्या आहे की घातपात याची चौकशी सीआयडीमार्फत केली जावी, अशी मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने पीडित मृत विद्यार्थ्याचे कुटुंबियांसह शुक्रवारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण कार्यालयावर आंदोलन केले.
या मृत्यूची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर आणावे, तसेच या आधीही घडलेल्या अशा प्रकरणांची कारणे शोधून संबंधीतांवर कारवाई व्हावी, करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रम शाळांना वॉल कंपाउड असणे, तसेच शाळेच्या आवारात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविणे अशाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच शासन निर्णयाप्रमाणे शाळेतील मुख्याध्यापक , अधिक्षक व अधीक्षीका यांनी शाळेच्या मुख्यालयात राहणे आवश्यक आहे, पण तसे होत नसल्याची तक्रार करण्यात आली. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक शिक्षीत, आदिवासी तरुण वर्ग, संस्था-संघटना यांच्याशी सल्ला मसलत करुन विविध योजना राबविण्यात याव्यात, आदिवासी विभागाच्या योजनांची जाहिरात खेडोपाडी पोहोचविण्याचे काम स्थानिक सक्रिय असणाऱ्या संस्था संघटना कार्यकर्ते यांना सोबत घेवून करावे, अशीही मागणी करण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कार्यालयाशी संबंधीत क्षेत्रामधील आदिवासीमधील विद्यार्थी , विद्यार्थीनी , ग्रामस्थ यांच्या असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत, संबंधीत अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारावर लगाम लावण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आली