Home > News Update > अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास निलंबन

अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास निलंबन

•मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश

अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास निलंबन
X

मुंबई, दि. २३ : महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशारा देत, महसूल अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याचा, प्रकार वारंवार घडत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यासह अन्य शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची सूचना आज महसूल विभागाने जारी केली. सामान्य प्रशासन विभागाच्या हवाल्याने महसूल विभागाने परिपत्रक काढले.

महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांतील तहसीलदार ते निवडश्रेणीतील अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक (भूमी अभिलेख) यांच्या अधिनस्थ काही अधिकारी वारंवार विनापरवानगी मुख्यालयात गैरहजर राहत असल्याचे आढळून आले. यासंदर्भात महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आलेल्या तक्रारींची पडताळणीत केल्यावर तथ्य आढळून आल्याने तातडीने परिपत्रक जारी करण्यात आले. अधिनस्त अधिकारी परवानगीशिवाय मुख्यालय सोडत असल्यास त्यांना प्रथम सक्त इशारा द्या, सुधारणा न झाल्यास तत्काळ शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करा तसेच गरज पडल्यास निलंबनाची कार्यवाही थेट करा, असे परिपत्रकात म्हटले आहे.

विभागाच्या महत्त्वाच्या बैठका किंवा आकस्मिक परिस्थितीत प्रशासनास अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा जनता कामानिमित्त ताटकळत बसते, अशा स्थितीत काही अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. यामुळे, शासकीय सुट्ट्या किंवा शासकीय दौऱ्यावर अधिकारी व कर्मचारी असतील तर गैरहजरी मान्य करण्यात येईल. मात्र, इतर वेळी मुख्यालयात उपस्थित राहणे परिपत्रकातून बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या अखत्यारीतील कोणताही अधिकारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही. असे आढळून आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. ही कारवाई शिस्त, कार्यक्षमता व लोकाभिमुख प्रशासन अबाधित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

____

जनतेच्या कामासाठी कसूर कोणत्याही स्थितीत सहन केला जाणार नाही. नियम व कायदा पाळून जनतेची कामे करण्यासाठी महसूल विभाग आहे. जनतेला ताटकळत ठेवण्यासाठी नाही. जे अधिकारी विनापरवानगी वारंवार गैरहजर राहतात त्यांना एक संधी देऊन नंतर थेट कारवाई हा पर्याय वापरला जाईल.

Updated : 23 April 2025 9:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top