जहांगीरपुरीतील कारवाईला स्थगिती,सर्वोच्च न्यायालयाचा दणका
X
दिल्लीच्या जहांगीरपुरी (jehangirpuri)भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली होती, . या हिंसाचारत आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलीस याप्रकरणी तपास करत असून आतापर्यंत २५ जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन ताब्यात आहेत. दरम्यान पालिकेने दंगलग्रस्त भागातील अनधिकृत बांधकांमावर कारवाई सुरु केली होती. आता या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) स्थगिती दिली आहे.
दिल्लीच्या भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्षांनी दंगलीतील आरोपींनी जहांगीरपुरीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामं उभी केल्याचा दावा करत यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली असून बुल्डोझरच्या सहाय्याने अनधिकृत दुकानं, घरं तोडली जात आहेत. दोन दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ४०० पोलीस तैनात करण्यात आले होते.
आता सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईला पुढील सुनावणीपर्यंत थांबविण्याचे आदेश दिले आहेत. उद्या म्हणजेच गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. गुरुवारपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जहाँगीरपुरी परिसरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची आम्हाला नुकतीच माहिती मिळाली. आधी आदेश वाचून त्यानुसार कार्यवाही करू, असं उत्तर दिल्ली महापालिकेचे आयुक्त संजय गोयल यांनी म्हटलं आहे. कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरुच असल्याचे सुप्रिम कोर्टात निदर्शनास आणुन दिल्यानंतर कोर्टानं कोर्ट रजिस्ट्रीला कोर्टाच्या आदेशाची प्रत तातडीने नॉर्थ दिल्ली महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांना देण्याचे आदेश दिले आहेत.