हक्कभंगाबाबत अर्णव गोस्वीमाला समन्स, बुधवारी हजर राहावे लागणार
X
आधी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर टीआरपी घोटाळ्यात अडचणीत आलेल्या अर्णव गोस्वामीला आता हक्कभंग प्रकरणीही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. हक्कभंग प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचा संपादक असलेल्या अर्णव गोस्वामीला समन्स जारी करण्यात आले आहे.
बुधवारी संध्याकाळी पाच वाजता विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये शपथेवर सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा हक्कभंग मागील अधिवेशनात दाखल केला होता. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख करणे आणि सरकारची बदनामी करणे हे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
हक्कभंग समितीसमोर बोलावणे हा एक वैधानिक प्रक्रियेचा भाग आहे त्या अंतर्गतच अर्णब गोस्वामी यांना बोलवण्यात आले आहे. अशीच गती इतर प्रकरणांमध्ये दाखवली असती तर मानलं असतं अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अर्णव गोस्वामीच्या हक्कभंग सुनावणीवर टीका केली आहे.