सुल्ली डील, बुल्ली बाई... इतना सन्नाटा क्यू है भाई ?
X
सहा महिन्यांपूर्वी मुस्लिम महिलांना सुल्ली डील प्रकरणात टार्गेट करण्यात आलं होतं. त्यानंतर बुल्ली बाई ॲपच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं आहे.
मुस्लिम महिलांना वारंवार सोशल मीडियावर अशाप्रकारे टारगेट केलं जात असतांना कला, साहित्य, राजकारण या क्षेत्रातील बोटावर मोजण्याइतपत लोक या संदर्भात बोलत आहेत. इतर वेळेस सोशल मीडियावर बोलणारे लोक या सर्व प्रकरणांमध्ये मुग गिळून गप्प आहेत. मॅक्स महाराष्ट्राचे संस्थापक-संपादक रवींद्र आंबेकर यांनी एक ट्वीट करत भविष्यातील धोक्याबाबत इशारा दिला आहे.
"आज मुस्लिम महिलांना लक्ष्य करणारे, उद्या तुमच्याही पोरी - बाळींना सोडणार नाहीत" असा इशारा दिला आहे. ते म्हणतात, मुस्लीम महिलांना लक्ष्य करणारे, विक्री साठी 'रेट' फिक्स करणारे उद्या तुमच्याही पोरीबाळींना सोडणार नाहीत. म्हातारी ही मेली आणि काळ ही सोकावलाय ! अजूनही शांत बसणार आहात का ?
आज छत्रपती शिवाजी महाराज हवे होते ! #SulliDeals #Bullibai #BulliDeals
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अशाप्रकारे एका समाजातील महिलांना टार्गेट केलं जात असताना 'ही वेबसाईट निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई का केली जात नाही ?' असा सवाल केला आहे.
अल्ट न्यूज चे मोहम्मद जुबेर यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून "मला महाराष्ट्र पोलिसांचा यासंदर्भात कॉल आला होता. त्यांना या संदर्भात पूर्ण माहिती दिल्याचं त्यांनी म्हटले आहे.
तसेच केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी github द्वारे हा सर्व मजकूर काढून टाकण्यात आला असून CERT आणि पोलीस अधिकारी पुढील कारवाई करत असल्याचे म्हटले आहे. यावर मोहम्मद जुबेर यांनी अशाच प्रकारे सुल्ली डीलच्या वेळेस सांगण्यात आलं होतं. मात्र, पोलीस त्यांना शोधू शकले का? असा सवाल उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी यासंदर्भात ट्विट केले असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
थोडक्यात, देशातून महिलांची धार्मिक द्वेषापोटी महिलांची बदनामी केली जात असतांना बोटावर मोजण्याइतपत लोक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो किंवा विविध क्षेत्रातील मान्यवर असो, अशा प्रकारे एका समाजातील महिलांवर वारंवार अन्याय होत असताना गप्प असणं सशक्त समाजासाठी धोकादायक आहे .