MaxMaharashtra Impact : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच अनधिकृत पार्किंग आणि बांधकामाविरोधात यशस्वी आंदोलन
X
वरळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अनधिकृत पार्किंग आणि बांधकामांविरोधात सोमवारी आंदोलन केलं. दिवसाखेर प्रशासनाला देखील या आंदोलनाची दखल घेत या बांधकामांवर कारवाई करावी लागली.

वरळी येथील डॉ. बाबाßसाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलांच्या वसतीगृहाच्या आवारात गेल्या अनेक महिन्यापासून अनधिकृत बांधकाम सर्रासपणे सुरू आहे. याविरोधात वसतीगृह प्रशासन वारंवार स्थानिक पोलिसांकडे या प्रकारची तक्रार करत होत. बांधकाम विभागाच्यावतीने वरळी येथील बांधकाम विभागाला अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश देऊन सुद्धा प्रशासन मात्र स्थानिकांच्या दबावामुळे मूग गिळून गप्प बसले होते.

शिवाय वसतीगृहाच्या आवारात, रहदारीच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग केले जाते. याबद्दल सुद्धा पोलीस प्रशासनाला वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नव्हती. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचा आहे. ही सर्व परिस्थिती बघता विद्यार्थ्यांनी जो पर्यंत अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत पार्किंग कायमस्वरूपी हटवले जात नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलनाचा करण्याचा पवित्रा सोमवारी सकाळी घेतला.

अवघ्या काही तासांतच विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला इतर राजकीय संघटनांचा देखील पाठींबा मिळत गेला. विद्यार्थ्यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहून प्रशासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. पोलिस प्रशासनाला देखरेखीखाली ही अनधिकृत बांधकामे अखेर जमीनदोस्त करण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांचं यावरच समाधान झालेलं नाही. जोपर्यंत वसतिगृहाच्या आवारातील अनधिकृत पार्किंगवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

काही वर्षांपूर्वी एका विद्यार्थिनीने या वसतिगृहात आत्महत्या केली होती. त्या विद्यार्थिनीचा मृतदेह घेण्यासाठी अवैध पार्किंगमुळे रुग्णवाहिकेला वसतिगृहाच्या आवारात येण्यासाठी अडथळा झाली होती. अखेर विद्यार्थ्यांनीच तो मृतदेह वसतीगृहाच्या आवारात असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेल्याच एका आंदोलक विद्यार्थिनीने यावेळी सांगितल.