Home > News Update > 'अग्नीपथ' योजनेविरोधात विद्यार्थी आक्रमक, रेल्वेच्या डब्याला लावली आग

'अग्नीपथ' योजनेविरोधात विद्यार्थी आक्रमक, रेल्वेच्या डब्याला लावली आग

अग्नीपथ योजनेविरोधात विद्यार्थी आक्रमक, रेल्वेच्या डब्याला लावली आग
X

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने लष्कर, नौदल आणि वायुदलात सैन्य भरतीसाठी अग्नीपथ नावाची योजना जाहीर केली. मात्र या योजनेला देशभरातील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने लष्करी भरतीसाठी अग्नीपथ नावाची योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेला युवकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. तर अग्नीपथ योजनेविरोधात बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. तर यावेळी विद्यार्थ्यांनी रेल्वे अडवून दगडफेकही केली. याबरोबरच संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या डब्याला आग लावल्याचेही समोर आले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेनुसार 25 टक्के युवकांना सेवेत संधी दिली जाणार आहे. त्यामुळे चार वर्षानंतर या तरूणांचे भवितव्य काय? असा सवाल करत हातात भारतीय लष्कराचे चाहते असे बॅनर घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तर हे आंदोलन चिघळले आहे.

संतप्त विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी लावलेली आग विझवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

काय आहे अग्नीपथ?

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत पत्रकार परिषद घेऊन अग्नीपथ या योजनेची घोषणा केली. तसेच ही योजना भारतीय लष्कराला तरूण चेहरा देईल, असं मत राजनाथ सिंह यांनी केले. त्याबरोबरच या योजनेंतर्गत भारतीय तरुणांना चार वर्षे लष्करी सेवेत 'अग्नीविर' म्हणून काम करता येणार आहे. तर या योजनेमुळे व्यापक स्तरावर देशाला प्रतिभावान सैनिक मिळतील, असं मत या योजनेची घोषणा करताना व्यक्त केले.

अग्नीपथ योजनेत मोबदला काय मिळणार?

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, 46 हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती करण्यात येणार आहे. तर यासाठी वयोमर्यादा ही 17 वर्षे ते 21 वर्षे यादरम्यान असेल. त्यामध्ये पहिल्या वर्षी 30, दुसऱ्या वर्षी 33 तर तिसऱ्या वर्षी 36 हजार 500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मोबदला मिळणार आहे. तर यानंतर अग्निविराला 11 लाख 71 हजार रुपये करमुक्त सेवानिधी आणि सेवाकाळात 48 लाख रुपयांचे विमाकवचही मिळणार आहे, अशी घोषणा राजनाथ सिंह यांनी केली.

या योजनेवर आक्षेप काय?

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेत चार वर्षे सेवेनंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून लष्करी सेवेत जाण्यासाठी तयारी करत आहेत. मात्र अग्नीपथ योजनेच्या माध्यमातून फक्त चार वर्षेच सेवेची संधी मिळणार असल्याने युवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या योजनेमुळे गरीब कुटूंबातील विद्यार्थी पैशासाठी या योजनेत सहभागी होतील. मात्र या योजनेमुळे त्यांच्या उच्च शिक्षणावर परिणाम होईल. या योजनेच्या माध्यमातून उच्चवर्णिय आणि बहुजन दरी निर्माण करण्याचा डाव असल्याची टीकाही केली जात आहे. सैनिकांच्या पेन्शनचा ताण सरकारवर येत असल्याने पेन्शनचा विषयच संपून टाकण्यासाठी सरकार ही चाल खेळत असल्याची टीकाही यावर केली जात आहे. ही योजना बेरोजगारी निर्माण करण्याचा कारखाना बनेल, असाही आक्षेप या योजनेवर घेतला जात आहे.

Updated : 16 Jun 2022 1:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top