Home > News Update > महापुरुषांच्या अवमानाबाबत भाजपचा दुट्टपीपणा ; कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा

महापुरुषांच्या अवमानाबाबत भाजपचा दुट्टपीपणा ; कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. आज दुसऱ्या दिवशी बेळगावमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. बेळगावमध्ये कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या पार्श्वभुमीवर शहरात बुधवारपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे

महापुरुषांच्या अवमानाबाबत भाजपचा दुट्टपीपणा ; कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा
X

बेळगाव // छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. आज दुसऱ्या दिवशी बेळगावमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. बेळगावमध्ये कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या पार्श्वभुमीवर शहरात बुधवारपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. भीतीपोटी लोकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. बेळगावमध्ये संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीची विटंबना झाली म्हणून आज सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना अटक करून शहाराबाहेर सोडून दिले.

ही मूर्ती कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी प्रस्थापित नव्हती, ही मूर्ती उत्सव मूर्ती होती. त्यामुळे सदर मूर्तीची विटंबना हि राजकीय हेतूने करून मराठी लोकांना बदनाम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांनी सांगितले की, 65 वर्ष आंदोलन सुरु आहे पण कधीही मराठी माणसाने महापुरुषांच्या पुतळ्याचे विटंबन केले नाही. त्यामुळे ती घटना राजकीय हेतूने प्रेरित आहे असे बोलले जात आहे.

पण , दुसरीकडे ज्या मराठी लोकांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ न्याय मागितला त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केलेत. एकूण 61 मराठी लोकांवर गुन्हे दाखल केले असून 27 लोकांना अटक केली आहे. त्यांच्यावर 307 कलम सारखे गंभीर गुन्हे घालण्यात आलेत. या उलट ज्यांनी कर्नाटक येथे निंदनीय कृत्य केले त्यातील 7 जणांना अटक केली असल्याचे वृत्त आहे. पण न्याय मागणाऱ्या मराठी लोकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे सीमाभागात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून केला जाणारा कन्नड - मराठी भेदभाव यामुळे नाराजी पसरली आहे.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे देखील बेताल वक्तव्यावरून नाराजी उमटली आहे. कारण त्यांना संगोळी रायण्णा यांच्या मुर्तिची कथित विटंबना गंभीर वाटते आणि बंगलोर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेची घटना शुल्लक वाटते. मुळात कर्नाटक घटनेमुळे या सगळ्याची सुरुवात झाली. पण कर्नाटकाचे भाजपचे मुख्यमंत्री यावर गप्प आहेत. किंबहुना महाराष्ट्र भाजप देखील गप्प असून महाराष्ट्रातील भाजप नेते कर्नाटकाच्या लोकांची री ओढत असल्याने , छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भाजप राजकारण करत असून त्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे व त्यांच्यावरील अपमानकारक घटना भाजप राज्यात होऊन देखील निषेध व्यक्त होत नाही यामुळे भाजपचा दुट्टपीपणा समोर येत असल्याचे बोलले जात आहे.

Updated : 20 Dec 2021 12:04 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top