विमानाने दुबईहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध
विमानाने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई पालिका प्रशासनाने कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई विमानतळावर जगभरातील प्रवाशांचा संपर्क येतो. म्हणून दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.
X
मुंबई //विमानाने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई पालिका प्रशासनाने कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई विमानतळावर जगभरातील प्रवाशांचा संपर्क येतो. म्हणून दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबत नवीन नियमावली जारी केली आहे.
ओमायक्रॉनचा धोका असलेल्या १२ देशांची यादी भारत सरकारने तयार केली आहे. आणि त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर आधीच निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र या १२ देशातील प्रवासी अनेकदा दुबई मार्गे आपल्या पुढील प्रवासाला जातात. त्यामुळे दुबई विमानतळावर अनेक देशातील प्रवासी उतरतात व त्यांचा एकमेकांशी संपर्क येतो. यापुढे दुबईतून येणाऱ्या प्रवाशांवरही मुंबई पालिका प्रशासनाचे लक्ष असणार आहे.
दुबईहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवसांचे गृह विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.
विमानतळावर उतरल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता राहणार नसली तरी पुढील सात दिवस त्यांच्याशी पालिकेच्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. सातव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.
प्रवासी बाधित नसला तरी त्याला सात दिवस सतर्क राहावे लागणार आहे. मात्र प्रवासी बाधित आढळल्यास त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे.दुबईहून आलेल्या प्रवाशांशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समन्वय साधला जाणार आहे.
या प्रवाशांना सार्वजनिक परिवहन सेवा वापरता येणार नाही. त्यांच्या प्रवासाची सोय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जाणार आहे.