औरंगाबाद: पैठण आगारातून बसली सुटली अन् काही तासात अज्ञाताकडून फुटली
X
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप सुरूच आहे. तर काही ठिकाणी कर्मचारी कामावर परत येत असल्याने आगारातून बस सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. औरंगाबादच्या पैठण आगारातून शनिवारी रात्री बस सोडण्यात आली मात्र परत येतांना अज्ञात व्यक्तींनी बसची तोडफोड केल्याने बस पुन्हा आगारात उभी करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील 600 पेक्षा जास्त एसटी बस गेल्या काही दिवसांपासून जागेवरच उभ्या आहेत. तर शनिवारी पैठण आगारातील दोन कर्मचाऱ्यांनी कामावर परत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर पैठण-पाचोड बस सोडण्यात आली होती.मात्र पाचोडहुन परतणाऱ्या बसवर राहटगाव जवळ येताच अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. ज्यात बसच्या मागच्या काचा फुटल्या आहेत.
त्यामुळे एसटी कर्मचारी यांनी सुरू केलेल्या संपाला हिंसक वळण लागत असल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तर दगडफेक झालेली बस पुन्हा पैठण आगारात1 आणून उभी करण्यात आली आहे.