"तुम्ही लोक तृणमूल काँग्रेसला जरा जास्तच महत्व देत आहात" ; अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
X
नवी दिल्ली : गोव्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोवा विधानसभा निवडणुक लढण्यासाठी तृणमूल काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान याबाबत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी तृणमूल काँग्रेस स्पर्धेत कुठेच नसल्याचं म्हटलं आहे. पणजी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणाले की, मला वाटतं तुम्ही लोक (माध्यम) तृणमूल काँग्रेसला जरा जास्तच महत्व देत आहात. त्यांच्याकडे सध्या १ टक्के मतंही नाहीत. फक्त तीन महिन्यांपूर्वी ते गोव्यात आलेत. लोकशाहीत असं चालत नाही. तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतात, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
दरम्यान , केजरीवाल यांनी यावेळी मतदारांना आवाहन करताना गोव्यात भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ असं आश्वासन दिलंय. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी गोव्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला , अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं त्यांनी म्हटलं. "काँग्रेस, भाजपा सर्वच पक्ष भ्रष्टाचारी असल्याने गोव्यातील लोकांना काही पर्याय नव्हता. मात्र, आता आम आदमीसारखा स्वच्छ पक्ष आला आहे, त्याला संधी द्या," असं आवाहन केजरीवालांनी केलं. गोव्यात ४० जागांसाठी दोन महिन्यात निवडणूक होणार आहे. आप आणि तृणमूल काँग्रेस गोव्यातील निवडणुकीत उतरल्याने यावेळी भाजपाला मोठ्या आव्हानाचा सामोरं करावा लागणार आहे.