नंदुरबारमध्ये भाजप एक परिवार कंपनी आहे- के. सी. पाडवी.
X
नंदुरबार : नंदुरबारमध्ये भाजपा हा पक्ष एका परिवारा भोवती फिरत असून हा पक्ष नसून एक परिवार कंपनी आहे असे परखड मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी मांडले. नंदुरबार जिल्हा परिषद व शहादा ,नंदुरबार पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. यावर प्रतिक्रिया देताना , के. सी. पाडवी यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळाले आहे यात निश्चितच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहभाग आहे. शहादा पंचायत समिती भाजपकडून काँग्रेसच्या ताब्यात गेली त्यात माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
त्यांनी व जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी यांनी दिवस रात्र मेहनत करून या पोटनिवडणुकीमध्ये यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार पंचायत समिती व जिल्हा परिषद गटांमध्ये ज्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे ,यात शिवसेना काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची मेहनत होती. प्रत्येकांनी आपसात समन्वय साधत हे यश संपादन केले आहे .यामुळे नंदुरबार जिल्हा परिषद ही महाविकास आघाडीकडे होती आणि आताही महाविकास आघाडीकडेच आहे असे मत आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी व्यक्त केले.