कोरोनाचे सावट, चैत्यभूमीवर गर्दी नको
महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावे, चैत्यभूमीवर प्रत्यक्ष येणे व गर्दी करणे टाळावे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन.
X
यंदाच्या 6 डिसेंबरच्या महपरिनिर्वाण दिनावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायांनी गर्दी न करण्याचे राज्य सरकारचे आवाहन. चैत्यभूमीवरील दर्शन अनुयायांना घरी बसून लाईव्ह घेण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. दरवर्षी लाखो आंबेडकर अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येऊन आंबेडकरांना आदरांजली अर्पण करत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे चैत्यभूमीवर अनुयायांनी येऊ नये असं सरकारचं आवाहन आहे.
चैत्यभूमी च्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण
चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे राज्यातील प्रमुख वाहिन्यांसोबतच सरकारी वाहिन्या तसेच विविध माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे, विशेष म्हणजे हे लाईव्ह आणि त्यासाठीचे तंत्रज्ञान राम मंदिराच्या पायाभरणी दरम्यान वापरण्यात आले होते त्या पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून चैत्यभूमी येथील कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे राज्यातील आणि देशातील प्रत्येक आंबेडकरी अनुयायांना आपल्या घरीच हा कार्यक्रम पाहता येईल अशी सोय करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका खर्च करणार असली तरी आवश्यकता पडल्यास सामाजिक न्याय विभागसुद्धा यासाठीचा निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.
महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावे, चैत्यभूमीवर प्रत्यक्ष येणे व गर्दी करणे टाळावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे सुरु असलेल्या तयारीच्या नियोजनाचा तसेच इंदू मिल येथे उभे राहत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मार्च 2023 मध्येच पूर्ण केले जाईल आणि त्याचा लोकार्पण सोहळा 14 एप्रिल 2023 रोजी केला जाईल, यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. आंबेडकर स्मारकाच्या दोन्ही तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून मुख्य प्रवेशद्वार आमच्या सूचनेनंतर ते साडेसहा फुटावर नेण्यात आले आहे. इतर कामे ही वेगात असल्याची माहितीही मुंडे यांनी यावेळी दिली. स्मारक बांधकामाच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय खात्याकडे असून, या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी विभागामार्फत एका सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे यावेळी मुंडे यांनी सांगितले.
मुंडे यांनी आंबेडकर स्मारक समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. स्मारकाच्या बांधकामासंदर्भात कोणती तयारी सुरू आहे याचाही एम एम आर डी ए, सामाजिक न्यायचे अधिकारी, काम करणारी कंपनी यांच्या समवेत बैठक घेऊन आढावा घेत हे सर्व काम दोन महिने अगोदर म्हणजेच मार्च 2023 पूर्वी झाले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी दिल्या