समीर वानखेडे यांच्या विरोधात राज्य सरकारची चौकशीची घोषणा, 4 अधिकारी करणार चौकशी
X
मुंबई : एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर राज्य सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. राज्य सरकारने आदेश काढून 4 अधिकाऱ्यांची नावं देखील जाहीर केली आहे. एकीकडे नवाब मलिक यांचे आरोप आता राज्य सरकारने लावलेली चौकशी यामुळे समीर वानखेडेंना दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल करत धक्कादायक आरोप केले आहेत, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले 8 कोटी रुपये NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांना मिळणार होते. तसं फोनवर संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे.
दरम्यान याबाबत राज्य सरकारने आदेश काढले आहेत , त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले , पोलिस निरीक्षक अजय सावंत,सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पारकर, पोलिस उप निरीक्षक प्रकाश गवळी हे समीर वानखेडे यांची चौकशी करणार आहेत.
प्रभाकर साईल, ॲड सुधा द्विवेदी, ॲड कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने 4 पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मागील अनेक दिवस नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना रंगला आहे. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.