महामंडळाचा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा: अजित पवार
X
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्याचबरोबर सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नामदेव भोसले, नियोजन विभागाचे उपसचिव देसाई, नियोजन विभागाचे अवर सचिव बोरकर, वित्त विभागाचे सहसचिव दहीफळे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील सर्व समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसह समतोल सामाजिक प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या प्रवर्गासाठी विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून योजना राबविण्यात येतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणुकीबरोबरच लघू उद्योग, वाहतूक, अन्य व्यवसायिक उद्योगासाठी आर्थिक मदत करताना राज्यातील सर्व भागातील जास्ती-जास्त तरुणांना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबरोबरच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळासह इतर सर्व महामंडळासाठी तरतुद केलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.