एसटी कर्मचारी संघटना संपाच्या भूमिकेवर ठाम ; २४० आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग
X
मुंंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, या मागणीचा विचार करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असली तरी कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही , त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. किंबहुना संपाची व्याप्ती राज्यभरात वाढली आहे, सुमारे २४० आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे एसटी सेवा पूर्णपणे कोलमडली आहे, ग्रामीण भागांत तर प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेतला तपशील मान्य नसल्याचे म्हणत एसटी कर्मचारी संघटनांनी संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे राज्य सरकारने विशेष समिती स्थापण्याबाबत अधिसूचना काढली. लगेचच समितीने तातडीने बैठक देखील घेतली व त्याचा इतिवृत्तही तयार केला, अशी माहिती मुख्य सरकारी वकील पी.ए. काकडे यांनी न्या. एस. जे. काथावाला व न्या.एस.पी. तावडे यांच्या खंडपीठाला दिली.