STचे विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती
X
एसटीच्या राज्य सरकारमधील विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. एकीकडे कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने समितीची स्थापना केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर करुन यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी वारंवार मांडली आहे. पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रत्येक जण मागणी करु लागला तर अडचण होईल, असे सांगत अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. संपकरी एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल सरकारने सर्व विचार केला, त्यांच्याशी चर्चा केली. पण प्रत्येकाने विलिनीकरणाचा हट्ट केला, तर कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी ते शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी मांडली. एसटी कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ सरकारने दिली आहे, पगार उशिरात उशीरा १० तारखेपर्यंत करण्याचाही सरकारने शब्द दिला आहे. त्यामुळे एसटीचे विलीनीकरण हा विषय डोक्यातून काढून टाकावा असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
एकीकडे कोर्टाच्या आदेशानंतर स्थापन केलेली समिती काय अहवाल देते त्यावर सरकार निर्णय घेईल, असे परिवहन मंत्री अनिल परब हे सांगत आहेत, तर दुसरीकडे विलिनीकरण शक्य नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे, त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.