Home > News Update > फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचे निधन, क्रिकेटविश्वावर शोककळा

फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचे निधन, क्रिकेटविश्वावर शोककळा

फिरकीचा जादूगार म्हणून जगभर प्रसिध्द असलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्नचे निधन झाल्याने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.

फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचे निधन, क्रिकेटविश्वावर शोककळा
X

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिरकीचा गोलंदाज म्हणून ओळख असलेला ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्नचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमधील व्हिलामध्ये बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्यानंतर डॉक्टरांनी शेन वॉर्नची तपासणी करून मृत घोषित केले.

ऑस्ट्रेलियन फॉक्स स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार शेन वॉर्नचा थायलंडमधील व्हिलामध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला. याबाबत शेन वॉर्नच्या व्यवस्थापन टीमने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले की, शेन वॉर्न ऑस्ट्रेलियन वेळेनुसार शनिवारी सकाळी बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नानंतरही वॉर्न शुध्दीवर येऊ शकला नाही. दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शेन वॉर्नची आंतरराष्ट्रीय कारकीर्द धमाकेदार होती. त्याला फिरकीचा जादूगार म्हणून ओळखले जात होते. तर त्याने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट तर 194 वनडे सामन्यात 293 विकेट मिळवल्या होत्या. तसेच याव्यतिरीक्त शेन वॉर्नने प्रथम श्रेणई क्रिकेटमध्ये 1 हजार 319 विकेट मिळवण्याचा विक्रम केला होता.

शेन वॉर्नचा जन्म 13 सप्टेंबर 1969 रोजी झाला होता. त्याने 1992 मध्ये भारताविरुध्द खेळल्या गेलेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर सलग 15 वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर 2007 साली सिडनीमध्ये इंग्लडविरुध्द शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

सचिन तेंडूलकर याने शेन वॉर्नच्या निधनाबद्दल ट्वीट करून भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये शेन वॉर्नने म्हटले आहे की, शेन वॉर्नच्या निधनाचे वृत्त समजल्यामुळे हैराण आणि स्तब्ध झालो. वॉर्न तुझी आठवण येत राहील. मैदानावर असो की मैदानाबाहेर तुझ्यासोबतचा एकही क्षण निरस नव्हता. मैदानात अनेकवेळा समोरासमोर लढलो. पण मैदानाबाहेरही तु धमाकेदार होतास. भारतासाठी आणि भारतीयांसाठी तुझे स्थान खास होते. तरुणपणीच गेला, अशा शब्दात सचिन तेंडूलकर याने शेन वॉर्नच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

शेन वॉर्नच्या निधनाबाबत भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने ट्वीट केले. त्यामध्ये विरेंद्र सेहवाग याने म्हटले की, महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेला आणि फिरकीला कुल बनवणारा सुपरस्टार शेन वॉर्न या जगात नाही. जीवन हे नाजूक आहे. मात्र ते समजून घेणे अवघड आहे. त्यामुळे त्याचे मित्र, कुटूंब आणि जगभरातील चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत, अशा शब्दात क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने शेन वॉर्नच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर याने शेन वॉर्नच्या निधनाबद्दल ट्वीट करून म्हटले आहे की, हा क्रिकेटविश्वासाठी मोठा धक्का आहे. कारण महान क्रिकेटपटू शेन वॉर्न या जगात राहिला नाही.

Updated : 4 March 2022 9:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top