30 नोव्हेंबरपर्यत 100 टक्के लसीकरण होण्यासाठी ठाणे महापालिकेची विशेष मोहिम
X
ठाणे : ठाणे शहरात 100 टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उद्या (9 नोव्हेंबर) पासून व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही किंवा विहित मुदतीनंतर ज्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांनी आपले लसीकरण करुन घ्यावे व शासनाच्या निर्देशानुसार 30 नोव्हेंबरपर्यत पहिल्या डोसचे लसीकरण 100 टक्के होण्याच्या दृष्टीने महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नागरिकांनी केले आहे.
ठाणे शहरातील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण व्हावे यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत आरोगय विभाग व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस उपमहापौर पल्लवी कदम, उपआयुक्त मनिष जोशी, आरोग्य विभागाचे डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध लसीकरण केंद्र, लसीकरण ऑन व्हील, जम्बो लसीकरण केंद्र, आऊट रिच कॅम्पस , बाजारपेठा आदी ठिकाणी नियमित लसीकरण सुरू आहे. मात्र तरीही अनेक नागरिकांनी लस घेतलेली नाही. यासाठी 9 नोव्हेंबरपासून व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत 'हर घर दस्तक' या उपक्रमातंर्गत आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका या घरोघरी जावून लसीकरण न झालेल्या नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत, या दरम्यान ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे या मोहिमेतंर्गत तात्काळ लसीकरण केले जाणार आहे. यासाठी 167 पथकांची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच ठाणे महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नाही किंवा विहित मुदतीनंतरही दुसरा डोस घेतला नाही अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाणार नाही. यासाठी महापालिका अधिकारी /कर्मचारी यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र महापालिकेस सादर करावे लागणार आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांनाही लसीचे दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, जर रुग्णाच्या नातेवाईकांचे लसीकरण झाले नसेल तर तात्काळ त्यांना लसीकरण करुन घ्यावे लागणार आहे.
लसीकरणाबाबतची जनजागृती ही शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून शिक्षक देखील करणार आहेत. आमची शाळा व महाविद्यालय कोरोना सुरक्षित आहे, तुमचे घर कोरोना सुरक्षित आहे का? असा संदेश विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविला जाणार असून या माध्यमातून लसीकरणाबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच नागरिकांना लसीकरणाचा संदेश हा ठाणे महापालिकेच्या घंटागाड्यांच्या माध्यमातून देखील दिला जाणार असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.
सद्यस्थितीत ठाणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होत आहे, ही निश्चितच शहरासाठी आनंदाची बाब आहे, परंतु ही संख्या वाढू नये किंवा पूर्णपणे कमी व्हावी यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असून संपूर्ण ठाणे शहराचे लसीकरण व्हावे यासाठी ही विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेस ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे.