दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीच चौकशी करणार - ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
X
आज सकाळीच दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाला. मुंबईतील काही भागामध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दादर, माटुंगा, भायखळा या भागात वीज पुरवठा खंडित झाल्याचं समोर आलं.आता वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
"या घटनेची माहिती मिळताच मी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांशी सतत संपर्कात होतो. वीज पूरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी मी त्यांना सूचना दिल्या आणि या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच टाटा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ही प्रत्यक्ष बोलून वीज पुरवठा तात्काळ सुरू होण्याबाबत चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून
अवघ्या ७० मिनिटात दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला,"असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे. "या प्रकरणाची गंभीर दखल मी घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल,"असेही डॉ. राऊत यांनी जाहीर केले.
दक्षिण मुंबईसाठी ट्रॉम्बे ह्या मुख्य ग्रहण केंद्रामधून २२० kV कळवा - ट्रॉम्बे, मुलुंड - ट्रॉम्बे , सोनखर - ट्रॉम्बे, चेंबूर – ट्रॉम्बे, साल्सेट - ट्रॉम्बे १, साल्सेट - ट्रॉम्बे २ , चेंबूर - ट्रॉम्बे १ आणि चेंबूर - ट्रॉम्बे २ ह्या वाहिन्यांद्वारे विद्युत पुरवठा केला जातो.