सोलापूर: जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष
X
सोलापूर : सोलापूर शहरात घरगुती गॅसचा सुरू असलेला लाखोंचा काळाबाजार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचा उपयोग रिक्षामध्ये किंवा इतर वाहनात भरत असताना ही कारवाई झाली आहे.
यामध्ये एकूण ८ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऐन दिवाळीत घरगुती वापरातील गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विकल्याने सोलापुरात गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.
पोलीस प्रशासनाची जीवनावश्यक वस्तूंच्या काळ्या बाजारावर बारीक नजर शहरामध्ये अवैध धंदयावर प्रभावी कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत पोलीस आयुक्त हरीष बैजल व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) बापू बांगर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले होते. त्याअनुषंगाने शहर पोलीस आणि गुन्हे शाखा सोलापुरात अवैध धंदेवाल्यावर बारीक नजर ठेवली आहे.
सोलापुरात जीवनावश्यक वस्तूंचा देखील मोठा काळाबाजार होतो. त्यामध्ये रेशनचा गहू, तांदूळ ,पेट्रोल, घरगुती वापरातील गॅस सिलेंडरसह आदी वस्तू भेळमिसळ करत काळ्या बाजारत मोठ्या दराने विक्री केल्या जातात. पण जीवनावश्यक वस्तूच्या काळ्या बाजारातील उलाढाल रोखण्याचं काम महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी कधीच याकडे डोकावून बघत नाहीत.
शहरात गॅस सिलेंडरचा लाखोंचा रुपयांचा काळा बाजार सुरू
गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक, संदीप शिंदे व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी ९ नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करण्याकरता पेट्रोलींग करत होते. यावेळी गोपनीय व खात्रीशीर बातमी मिळाली की, सोलापूर शहरातील प्रभाकर महाराज मठाजवळ जवळकर वस्ती, सार्वजनीक शौच्यालयाचे बाजूस असलेल्या पत्र्याचे खोलीमध्ये अवैध रित्या घरगुती वापरातील गॅस टाक्यांचा साठा करून ते गॅस सिलेंडर गॅस टाक्या मधून अवैध रित्या रिक्षा व इतर वाहनामध्ये भरत आहेत. अशी गोपनीय माहीती मिळाली.
साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करून आठ आरोपींना अटक
गुन्हे शाखेच्या पथकाने ताबडतोब सदर ठिकाणी छापा टाकुन संगरत्न निजलिंगआप्पा इंगळे (रा. बुधवार पेठ मिलींद नगर, जी एम चौक जवळ सोलापूर), महेश बाबासाहेब कांबळे (रा.प्रभाकर महाराज मठा शेजारी सोलापूर) यांचेसह इतर ६ असे एकूण आठ संशयीत आरोपीतांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून एकुण १७ गॅस टाक्या, ७ रिक्षा, २ इलेक्ट्रीक वजन काटे, रिक्षात गॅस भरण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रीक मोटार व इतर साहीत्य असे एकूण ८ लाख ४१ हजार २५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप शिंदे, अजय देवराम पाडवी, तात्या पाटील, अजिंक्य माने, कुमार शेळके गणेश शिंदे, राजकुमार पवार व निलोफर तांबोळी संजय काकडे, ढेकणे यांनी पार पाडली.