Home > News Update > समाजवाद्यांचा बालेकिल्ला कोसळला: नितीन वैद्य

समाजवाद्यांचा बालेकिल्ला कोसळला: नितीन वैद्य

समाजवाद्यांचा बालेकिल्ला कोसळला: नितीन वैद्य
X

रमेश जोशी यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील एक अत्यंत उमदं, अखेरपर्यंत समाजवादी विचारांशी कमालीची बांधिलकी असलेलं लढाऊ व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांनी व्यक्त केली आहे.

गोरेगाव हा मुंबईतला एकेकाळचा समाजवाद्यांचा बालेकिल्ला. रमेश जोशी यांनी त्या पलिकडे जात मुंबई महापालिकेच्या शिक्षकांचे प्रश्न उचलुन धरत त्यांची संघटना तर बांधलीच, पण महापालिकेच्या शाळांचेही ते सतत पुरस्कर्ते राहिले. शिक्षकांतर्फे ते महापालिकेवर निवडुन गेले आणि मग केवळ शिक्षक, महापालिका शाळा इथपर्यंत मर्यादित न राहता ते मुंबईतल्या सामान्य नागरिकांचा महापालिका सभागृहातील बुलंद आवाज बनले. महापालिकेत येणाऱ्या विविध प्रस्तावांचा बारकाईने अभ्यास करत रमेश जोशी प्रशासनाला धारेवर धरत, सत्ताधारी शिवसेनेशी दोन हात करत. १९८६-८७ साल असावं. महापालिकेचं वार्तांकन करणाऱ्या आम्हा पत्रकारांचे रमेश जोशी तगडे 'सोर्स' होते. ब्रेकिंग न्यूजचा जमाना नव्हता तो. पत्रकारिता नेत्यांच्या भोवती केंद्रित झालेली नव्हती, तर ती या शहरातील सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणारी होती आणि त्यात आम्हा तरूण पत्रकारांचं एकप्रकारचं शिक्षणच रमेश जोशी करीत. ते करताना स्वतःच्या प्रसिध्दीची कसलीही अपेक्षा ते ठेवत नसत.

आम्हा काही पत्रकारांचं करियर घडविण्यात त्यांचा निश्चित वाटा होता. मुंबईतील गोरगरीबांच्या शिक्षणासाठी महापालिकेच्या शाळांची ज़ोरदार बाजु रमेश जोशी लावुन धरतच; पण स्वतःच्या आयुष्यात ती भूमिका आचरणातही आणत. तेव्हा (आणि आताही) मुंबईकरांच्या नावाने राजकारण करणाऱ्या अनेक नेत्यांची मुलं मोठमोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाताना दिसत, तर रमेश जोशी यांचा एकुलता एक मुलगा मात्र त्याचवेळी महापालिकेच्या शाळेत शिकत होता…तीनेक वर्षांपूर्वी गोरेगावात आमदार कपिल पाटील यांनी विविध क्षेत्रातल्या नामवंतांची बैठक न्युझीलँड हॉस्टेलमध्ये आयोजित केली होती, त्या बैठकीतही शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जाचा प्रश्न चर्चिला गेला असता रमेश जोशी यांनी 'तुम्हाला तुमची मुलं जात असलेल्या शाळांचा दर्जा खालावलाय असं वाटत असेल तर त्यांना महापालिकेच्या शाळांत घाला' असा जाहीर सल्ला दिला होता. तो देतानाच, महापालिका शाळांतील शिक्षकांनी मुंबईच्या गरीब वस्त्यांमध्ये राबविलेल्या प्रयोगांची माहितीही त्यांनी दिली होती.

महापालिका शिक्षकांचा दर्जा हा कुठल्याही खाजगी शाळांतील शिक्षकांच्या दर्जापेक्षा सरस असतो, असा त्यांचा ठाम दावा होता. बी.एड्. झालेले टॉप रँकर महापालिकेतील नोकरीला प्राधान्य देतात, कारण एकदा त्यांची निवड झाली की, पगारापासुन ते ५८ व्या वर्षी निवृत्त होईपर्यंतची शाश्वती त्यांना मिळते, जी कोणत्याही खाजगी संस्थांच्या शाळांत मिळत नाही, या त्यांच्या युक्तिवादावर सारेच गप्प झाले होते. महापालिका शाळा आणि त्यातील शिक्षक यांची आयुष्यभर संघटना बांधणाऱ्या या नेत्याच्या हातातुन ही संघटना जाताना बघण्याचं दुःखही त्यांच्या वाट्याला आलं. ती सल त्यांच्या मनात कायम राहिली. आयुष्यभर साथ देणाऱ्या पत्नीचं काही वर्षापूर्वी निधन झालं; त्यानंतर मुलगा साहिल आणि सुन प्रिया यांनी रमेश जोशी यांना छान सांभाळलं. पण प्रकृती साथ देत नव्हती. अशा लढाऊ बाण्याच्या रमेश जोशी यांची आयुष्यभराची लढाई आज थांबली, अशी भावना नितीन वैद्य यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 3 Oct 2022 8:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top