१४ प्राण्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही म्हणून एकाची आत्महत्या, वनविभागाची दिरंगाई?
X
प्राण्यांच्या हत्येप्रकरणी १० वर्षांपासून कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. शिवदास ढवळे असे त्यांचे नाव आहे. वनविभागाने शिकाऱ्यांवर कारवाई केली नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ढवळे यांनी हे सामाजिक कार्यकर्ते होते. नांदेड जिल्ह्यातील चोंडी येथे बुधवारी ही घटना घडली आहे .
या प्रकरणी नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच आरोपींना तात्काळ ताब्यात घ्यावे अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यात चोंडी येथे वनविभाग नांदेड परिक्षेत्रा अंतर्गत चोंडी येथील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला बांधकाम करतांना दहा वर्षांपूर्वी चार हरीण , दहा मोरांची हत्या झाली होती. या प्रकरणात आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी ढवळे यांनी वन विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु या प्रकरणात चौकशी होत नसल्याने शिवदास ढवळे यांनी राज्याचे गृहमंत्री, नांदेड जिल्हाधिकारी ,नांदेड वन विभाग ,जिल्हा पोलिस प्रशासन यांना 16 मार्च रोजी निवेदन देऊन या प्रकरणात चौकशी करावी अन्यथा 28 एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
वन विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे अखेर 28 रोजी चोंडी बंधाऱ्यावर जाऊन शिवदास ढवळे यांनी आत्मदहन केले . आत्मदहनापूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे लिहिली आहेत. नातेवाईकांनी आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी सुदमताबाई देविदास गीते, देविदास जळबा गीते, सदाशिव देविदास गीते, ज्ञानेश्वर देविदास गीते, गोविंद हरिश्चंद्र केंद्रे,सटवा सांगळे (सर्व राहणार चोंडी) यांच्या विरोधात माळाकोळी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे ,