Home > News Update > 'होळी करु लहान, पोळी करु दान', सामाजिक बांधिलकीचा आदर्श

'होळी करु लहान, पोळी करु दान', सामाजिक बांधिलकीचा आदर्श

उत्सवाचा सामाजिक संदर्भ काय असतो याचा आदर्श रायगड जिल्ह्यात घालून देण्यात आला आहे.

होळी करु लहान, पोळी करु दान, सामाजिक बांधिलकीचा आदर्श
X

सामाजिक सलोखा, सामाजिक जबाबदाऱ्या, सामाजिक ऐक्य वाढावे यासाठी सण आणि उत्सव साजरे केले जातात. पण काळाच्या ओघात या सण आणि उत्सवांना वेगळेच स्वरुप आले आहे. पण सण व उत्सव साजरे करताना सेवाभाव व सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे हा संदेश रायगड जिल्ह्यातील एक सेवाभावी संस्था आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपल्या कृतीमधून दिला आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागडमध्ये नैवेद्य म्हणून होळीमध्ये जाळल्या जाणाऱ्या शेकडो पोळ्या आदिवासीं आणि गोर गरिबांना देण्याचा स्तृत्य उपक्रम केला गेला आहे.




दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील 'होळी करु लहान, पोळी करु दान' असे आवाहन एक संघर्ष समाजसेवेसाठी ही संस्था व अंनिसने केले होते. त्यानुसार पालीतील एक संघर्ष समाज सेवेसाठी ग्रुप व अंनिस पाली-सुधागड शाखेच्या वतीने जवळपास एक हजारहुन अधिक पोळ्या गोळा करण्यात आल्या. या पोळ्या, पापड व फेण्या आदिवासी वाड्या-पाड्यांवर व गरीब वस्तीवर वाटून आदिवासी व गरिबांची होळी गोड करण्यात आली. बुरुमाळी येथील ग्रामस्थांनी देखील पोळ्या जमा करून त्यांचे वाटप केले.




'होळी लहान करू या, पोळी दान करू या' या कार्यक्रमाच्या पाठीमागे सुद्धा राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळणे व पर्यावरणाचे प्रदूषण थांबविणे हा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी हा उपक्रम राबिवला गेला. या तरुणांनी होळीच्या रात्री पालीतील सर्व होळ्यांच्या ठिकाणी जाऊन कागदी खोके वाटले. त्यामध्ये लोकांनी व्यवस्थितरीत्या पोळ्या संकलित करून ठेवल्या होत्या. ठिकठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येऊन पोळ्या आणून दिल्या. त्यामुळे होळीत जाणाऱ्या शेकडो पोळ्या गरिबांच्या मुखात गेल्या. तालुक्यातील दापोडे, तळई आदी आदिवासी वाड्यांवर तसेच टेंबी वसाहत येथे पोळ्यांचे वाटप करण्यात आले.

Updated : 29 March 2021 7:40 PM IST
Next Story
Share it
Top