धक्कादायक!आधार कार्ड नाही, पारधी विद्यार्थ्यांचा प्रवेश रोखला
X
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही पारधी समाजाची शिक्षणासाठी परवड थांबलेली नाही. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिंदी सिरसगाव या गावात अनेक वर्षांपासून पारधी समाज वास्तव्यास आहे. आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावे या उद्देशाने मुलांचा प्रवेश घेण्यासाठी शाळेत गेल्यावर त्यांना आधार कार्ड मागितले. परंतु अशा प्रकारचे कोणतेही रहिवासी पुरावे नसल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ या मुलांवर आली आहे.
अनेक वर्षापासून येथे वास्तव्य करणाऱ्या पारधी समाजातील ९ कुटूंबांना गावातील लोक या गावचे नागरिकच मानायला तयार नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
यासंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि लाल बावटा शेतमजूर युनियनचे नेते कॉ. राम बाहेती यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने या कुटुंबांची दखल घेतली आहे. तहसीलदारांनी या कुटुंबांची भेट घेउन पंचनामा केला आहे. तसेच वयाच्या पुराव्याची नोंद आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. परंतु तोपर्यंत शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
या घटनेमुळे वर्षानुवर्षे भटके जीवन जगणारा पारधी समाज आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे सिद्ध होत आहे. आजही लोक या समाजाला जवळ करायला तयार नाहीत. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने पारधी समुदायाच्या कागदपत्रांसंदर्भातील समस्या दूर करणे गरजेचे आहे.