Home > Max Political > किरीट सोमय्या येताच कोर्लईमध्ये शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने

किरीट सोमय्या येताच कोर्लईमध्ये शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने

किरीट सोमय्या येताच कोर्लईमध्ये शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने
X

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी त्यांनी कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये हजेरी लावली. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावार १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपाला संजय राऊत यांनी उत्तर देत असे बंगलेच नसल्याचा दावा केला आहे. यानंतर किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते. तसेच याच संदर्भात आपण ज्या गावात हे बंगले आहेत त्या कोर्लईमध्ये जाणार असल्याची घोषणा केली होती.

त्याप्रमाणे दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास किरीट सोमय्या यांनी या गावात दाखल झाले. दोन्ही पक्षांमधला वाद लक्षात घेता पोलिसांनी या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. किरीट सोमय्या यांनी गाडी त्या ठिकाणी दाखल होताच भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्या शिवसैनिकांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान किरीट सोमय्या हे ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आले, त्यांनी एक अर्ज ग्रामसेवकांना दिला, ते एकही शब्द बोलले नाहीत, अशी माहिती सरपंचांनी दिली. सोमय्या केवळ स्टंटबाजी करण्यासाठी आले होते, त्यांनी कोणतीही माहिती मागितली नाही, असेही त्यांनी सांगितले. या दरम्यान तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरीट सोमय्या देखील अवघी दहा ते पंधरा मिनिटेच तेथे थांबले. त्यानंतर ते पत्रकारांशी न बोलता बाहेर पडून निघून गेले. मात्र त्यानंतर शिवसैनिकानी ग्रामपंचायतीत गोमूत्र शिंपडले, सोमय्या यांच्या येण्याने ग्रामपंचायत अवपित्र झाल्याचे सांगत सरपंचांनी शिवसैनिकांच्या या कृतीचे समर्थन केले.

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावावर साडेनऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र या जागेवर बंगलेच नाहीत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. तसेच कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी देखील या जागेत बंगले नसल्याचे कागदोपत्री पुरावे असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. यावर किरीट सोमय्या यांनी बंगले नव्हते तर त्या 19 बंगल्याचा टॅक्स का भरला गेला की बंगले आता चोरीला गेले आहेत, असा सवाल उपस्थित केलाय.

Updated : 18 Feb 2022 4:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top