संपकरी एसटी कामगारांना धक्का, तासगाव ते सांगली एसटी धावली
X
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. पण आता हा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने निर्धार केला आहे. शिवसेना प्रणीत कामगार संघटना या संपात सहभागी झालेल्या नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता कामावर हजर करण्यात आले असून काही ठिकाणी एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातही अशाप्रकारे एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे.
"उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है." या जयघोषात तासगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी तासगाव सांगली एसटी सेवा सुरू केली आहे. तासगाव तालुक्यातील शिवसेना कामगार संघटनेच्या कामगारांना घेऊन एस टी सेवा सुरू करण्यात आली आहे. तासगाव ते सांगली या बसच्य़ा फेऱ्या कडक पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्यात आल्या. एसटीसोबत तासगावातील पोलीस निरीक्षक व पोलिसांचा मोठा फौजफाटा व त्यासोबत तासगाव येथील शिवसैनिक देखील होते. ही एसटी सेवा सुरू झाल्याने या बसने प्रवास करणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.