शेतकऱ्यांना चिरडणे हे भाजपचे कृषी धोरण आहे का?- संजय राऊत
X
उ. प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलन केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने गाडी घुसवून शेतकऱ्यांना चिरडले हा क्रूरपणा आहे, शेतकऱ्यांबद्दलचा हा भाजपच्या मनात असलेला द्वेष समोर आला आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत, तीन कृषी कायदे रद्द करा म्हणून सांगत आहे, मग शेतकरी हे देशद्रोही वाटले का, त्यांना अशाप्रकारे चिरडून टाकणे योग्य आहे का, असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.
विरोधी पक्षाच्या लोकांना लखीमपूरला जाण्यापासून रोखले गेले. प्रियंका गांधी यांना जाण्यास रोखले, निर्भया सारखे प्रकार होतात तेव्हा इतर पक्षांच्या लोकांना तिथे जाण्यापासून रोखणे ही कोणती लोकशाही, असा सवालही राऊत यांनी विचारला आहेत. महाराष्ट्रात साकीनाका प्रकरण झालं तेव्हा तिथे विरोधी पक्षाने मोठा गोंधळ केला पण त्यांना आम्ही थांबवले नाही, अशी आठवणही राऊत यांनी करुन दिली आहे. नरेंद्र मोदी आपल्या भाषणात शेतकऱ्याविषयी प्रेम व्यक्त करातात. विरोधकांवर टीका करतात हे ठीक आहे पण त्यांच्याच पक्षाचे राज्य सरकार शेतकऱ्यांवर गाड्या घालून त्यांना ठार मारतात, हे योग्य नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईत बाबू गेनूवर ब्रिटींशांनी गाडी चालवली होती, तशाचप्रकारे उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांवर गाडी चालवली गेली, अशी टीकाही त्यांनी केली आहे.