Home > News Update > मोदींच्या दौऱ्यामुळे बांगलादेशात शांततेची होळी- सामना

मोदींच्या दौऱ्यामुळे बांगलादेशात शांततेची होळी- सामना

मोदींच्या बांगलादेश दौऱ्यामुळे तिथला हिंदू असुरक्षित झाल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मोदींच्या दौऱ्यामुळे बांगलादेशात शांततेची होळी- सामना
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच बांगलादेश दौरा केला, पण या दौऱ्यानंतर बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले सुरू झाल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली आहे. एवढेच नाहीतर हा दौरा पश्चिम बंगाल निवडणुकीसाठीच आयोजित करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काय म्हटले या अग्रलेखात ते पाहूया...

बंगालात निवडणुकांचे रण पेटले असतानाच पंतप्रधान मोदी हे बाजूच्याच बांगलादेशच्या दौऱ्यावर जाऊन आले. बांगलादेशमध्येही मोदी हे तेथील जशोरेश्वरी कालिमाता मंदिरात जाऊन बसले. त्यांनी पूजाअर्चा केली. हे चित्र प. बंगालातल्या हिंदू मतदारांना प्रभावित करण्यासाठीच असावे. उत्तर प्रदेशच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मोदी नेपाळच्या मंदिरात होते, तर प. बंगालातील पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येस मोदी प. बंगालच्या सीमेवरील बांगलादेशातील मंदिरात होते हा योगायोग नक्कीच नाही. प. बंगालातील विधानसभा निवडणुका भाजपने म्हणजेच पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत व त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. प. बंगालात मोठय़ा प्रमाणावर 'बांगलादेशी' घुसले आहेत. त्या व्होट बँकेवर अनेक मतदारसंघांचे निकाल बदलणार आहेत. प. बंगाल व बांगलादेशची भाषा एकच आहे. बांगलादेशात राहणाऱयांची नातीगोती प. बंगालात मोठय़ा प्रमाणावर आहेत.

''बांगलादेशमधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांमुळे आम्ही व्यथित झालो होतो. या अत्याचारांची छायाचित्रे पाहून अनेक दिवस झोपही लागली नव्हती,'' असे मोदी यांनी ढाक्यात सांगितले. पंतप्रधान हे कमालीचे हळवे, दयाळू व संवेदनशील असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून गाझीपूर सीमेवर शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात ऊन, वारा, पावसात रस्त्यावर बसले आहेत. तेथे त्यांचे बळी गेले. अत्याचार सहन करीत हे शेतकरी तेथे बसले आहेत. याचे दुःख आपल्या पंतप्रधानांना होतच नसेल असे कसे म्हणता येईल?

बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा. मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने प. बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही, पण मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. कट्टरतावादी इस्लामी गटांनी हिंदू मंदिरांची तोडफोड केली आहे. हिंदू वसाहतींवर हल्ले सुरू झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 12 जण ठार झाले आहेत. सरकारी कार्यालये, लोकल ट्रेन्स, प्रेस क्लबवरही हल्ले करण्यात आले आहेत. मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याचे हे फलित आहे. पंतप्रधान मोदी बांगलादेशात जाऊन आले, पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला. त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, हाच एक उपाय आहे, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

Updated : 30 March 2021 8:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top