'रामद्रोही'... सामनातून मोदींवर टीका
X
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा होत असताना शिवसेनेला निमंत्रण न देण्यात आल्यावरुन सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे. पाहूया सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले आहे.
राममंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण अयोध्या न्यायालयीन लढाईतील मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी याला पाठविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर रामजन्मभूमीचा वाद संपलेला आहे. इक्बाल अन्सारी हा एकटा नव्हता, पण न्यायालयात राममंदिरविरोधी लढा देणाऱ्य़ा बाबरी ऍक्शन कमिटीचा तो एक प्रमुख चेहरा होता. त्याच्या पाठीमागे अनेक इस्लामी संघटनांनी मोठी शक्ती उभी केली होती.
अन्सारीने न्यायालयातली लढाई 30 वर्षे खेचली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व प्रकरण तारखांच्या गुंत्यात अडकून पडले, पण न्या. रंजन गोगोई यांनी रामाला त्या बाहेर काढले व स्पष्ट निकाल राममंदिराच्या बाजूने दिला. ते न्या. रंजन गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते, पण रंजन गोगोई नाहीत आणि बाबरीची घुमटे पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही. राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्य़ा कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास! भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे.
राममंदिराच्या राजकारणाबाबत वेगळी भूमिका असूनही काँगेस, समाजवादी पार्टी, डाव्या पक्षांतील अनेक जण मंदिर व्हावे या श्रद्धेचे होते. त्या सगळय़ांच्या भावनांची कदर होणे गरजेचे आहे. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राममंदिराचे श्रेय पी. व्ही. नरसिंह राव व राजीव गांधी यांना दिलेच आहे.
पंतप्रधान मोदी यांना ते राममंदिराचे श्रेय द्यायला तयार नाहीत, पण मोदी यांच्या काळातच न्यायालयाच्या गुंत्यातून राममंदिर सुटले व आजचा सुवर्णक्षण उगवला हे मान्य करावेच लागेल. तसे नसते तर राममंदिराच्या बाजूने निर्णय देणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्तीनंतर लगेच राज्यसभेचे सदस्य झाले नसते. राममंदिर निर्माणासाठी अनेकांनी वेगवेगळय़ा प्रकारे किंमत मोजली आणि योगदान दिले.
‘‘बाबरी पडली, ती पाडणाऱ्य़ा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे!’’ या एकाच गर्जनेने बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट म्हणून कोटय़वधी हिंदूंच्या दिलाचे राजे बनले. आज ते स्थान अढळ आहे. त्या सगळय़ांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर अयोध्येत उभे राहात आहे. पंतप्रधान राममंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील. बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला. राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल!