महाविकास आघाडीत खदखद, राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी रुपये आणतो....शिवसेना आमदाराची नाराजी
महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी दिला जात असून शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या एका नेत्याने जाहीरपणे गंभीर आरोप केल्याने महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.
X
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाहीये, तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत, असा दावा तिन्ही पक्षांचे राज्यस्तरीय नेते करत आहेत. पण आता निधी वाटपावरुन शिवसेनेच्या आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे ओमराजे निंबाळकर यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली असताना आता आणखी एका नेत्याने थेट राष्ट्रवादीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते हे अर्थसंकल्पामध्ये देखील हेच दिसून आलं असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. 65-60 टक्के बजेट राष्ट्रवादीला जाते, 30 ते 35 काँग्रेसला जाते, 16 टक्के रक्कम पगारावर खर्च करावे लागतात, त्यामुळे विकासकामांना केवळ 10 टक्के निधी मिळतो असे त्यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर तानाजी सावंत यांनी थेट इशाराच दिला आहे, "आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करू, पण आमची नाराजी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता" या शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
एवढेच नाही तर ग्रामीण भागात एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आऱोपही त्यांनी केला. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना का असं होतं आहे, असा सवालही तानाजी सावंत यांनी विचारला आहे.
यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी या नाराजीबबात विचारले असता, बजेट पाहिले तर असा अन्याय झालेला नाही, पण आमदारांची नाराजी असेल तर त्यावर महाविकास आघाडीतील नेते चर्चा करतील आणि नाराजी दूर करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.