शिवसेनेचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा
राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळून ठेवल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत होता. मात्र एमआयएमने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ऑफर दिल्यानंतर शिवसेनेने पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला आहे.
X
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. त्यातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची भुमिका बदलल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. तर त्यांनी पुन्हा एकदा हिंदूत्वाचा नारा देत शिवसेनेने हिंदुत्व सोडले नसल्याचे म्हटले आहे. ते शिवसंपर्क अभियान सुरू करण्यापुर्वी खासदार व आमदारांच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते.
यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत सगळं आपल्याच ताब्यात घेण्याचा भाजपचा डाव आहे. हे घातक हुकूमशाहीची नांदी आहे. त्यामुळे त्याला काटशह देणे आवश्यक आहे. तर भाजप राजकारणासाठीच हिंदुत्वाचा वापर करते. मात्र शिवसेना हिंदूत्वासाठी राजकारण करत असल्याचे मत व्यक्त केले.
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान उद्यापासून सुरू होत असून त्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि खासदार, पदाधिकारी घराघरापर्यंत शिवसेनेचे काम पोहचवणार आहेत, असे उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तर देशात भ्रमाचे वातावरण तयार केले जात असून एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त करणे हा भाजपचा कट असल्याची टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.
शिवसेनेला हिंदूत्वविरोधी ठरवणारा भाजप काश्मीरमध्ये अफजल गुरूच्या फाशीला विरोध करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सत्ता स्थापन करतो. पाकिस्तानमध्ये जाऊन पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करतो. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांविषयी केलेले विधाने वाचून दाखवत त्यांच्या नावापुढे खान लिहीणार का? आणि शिवसेनेला जनाब सेना म्हणून हिणवले जात असताना पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांचा केक कापणाऱ्या पक्षाला पाकिस्तान जनता पक्ष किंवा हिजबूल जनता पार्टी म्हणणार का? असा सवाल केला.
त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शांत दिसत होती. मात्र भाजपकडून शिवसेनेचा जनाब सेना उल्लेख केला जात असतानाच शिवसेनेने पुन्हा हिंदूत्वाचा नारा दिला आहे.